लुथरा बंधूंना जामीन मंजूर

‘बर्च’ अग्नितांडव : सरव्यवस्थापक विवेक सिंगचीही सुटका


01st April, 11:41 pm
लुथरा बंधूंना जामीन मंजूर

प्रतिनिधी । गोवन वार्ता
म्हापसा : हडफडे येथील बर्च क्लब अग्नितांडव प्रकरणी संशयित आरोपी गौरव लुथरा आणि सौरभ लुथरा यांची म्हापसा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने बुधवारी सशर्त जामिनावर सुटका केली. क्लबचे सरव्यवस्थापक विवेक चंद्रभान सिंग याचाही जामीन अर्ज न्यायालयाने मंजूर केला आहे.
लुथरा बंधूंना जामीन अर्ज मंजूर झाला असला तरीही त्यांना लगेच कोठडीतून बाहेर पडता येणार नाही. कांदोळी आरोग्य केंद्राची बनावट एनओसी सादर केल्याच्या प्रकरणात म्हापसा पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. त्याचा निकाल अद्याप प्रलंबित आहे. त्यामुळे कोठडीतून बाहेर पडण्यासाठी लुथरा बंधूंना आणखी काही दिवसांची वाट पहावी लागणार आहे. १७ डिसेंबर २०२५ रोजी अटक झाल्यापासून संशयित आरोपी सुमारे साडेतीन महिने कोठडीची हवा खात आहेत.
बुधवारी सुनावणीवेळी न्यायाधीश द्विजपल पाटकर यांनी लुथरा बंधू आणि विवेक सिंग यांच्या जामीन अर्जांच्या मंजुरीचा निवाडा दिला. प्रत्येकी ५० हजार रुपये हमी रक्कम आणि तितक्याच रकमेचा हमीदार याबरोबत इतर आवश्यक अटी न्यायालयाने त्यांना घातल्या आहेत. सविस्तर आदेशपत्र मिळाल्यावर न्यायालयाने कोणत्या अटी घातल्या आहेत, हे स्पष्ट होणार आहे. जामीन अर्जावरील निवाड्यावेळी अ‍ॅड. पराग राव, त्यांचे सहकारी वकील आणि संशयितांचे नातेवाईक उपस्थित होते. विवेक सिंगच्या वतीने अ‍ॅड. विनायक पोरोब यांनी युक्तिवाद केला. सरकारी वकील जेनिफर सांतामारिया व सहकारी अभियोक्ता हेही उपस्थित होते.
दरम्यान, बर्च क्लब आग दुर्घटना प्रकरणातील संशयित आरोपी क्लबचे मालक लुथरा बंधूंचा जामीन अर्ज म्हापसा अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने १२ फेब्रुवारी रोजी फेटाळला होता. त्यानंतर संशयितांनी जामीन मिळण्यासाठी पुन्हा नवीन जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायालयात सादर केला. त्यावर ११ मार्च रोजी अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात प्रथम सुनावणी झाली होती.
साकवाडी-हडफडे येथे ६ डिसेंबर २०२५ रोजी रात्री बर्च क्लबमध्ये झालेल्या भीषण आग दुर्घटनेत २५ जणांचा मृत्यू झाला होता. यात सहाजण जखमी झाले होते. मृतांमध्ये ५ पर्यटक, २० क्लबचे कर्मचारी होते. या प्रकरणात हणजूण पोलिसांनी ११ जणांना अटक केली होती. एकूण १४ संशयितांविरुद्ध भारतीय न्याय संहिंतेच्या १०५, १२५, १२५(अ), १२५(ब), २८७, ३३८, ३३८(३), ३४०(२), ६१(२), २३८, २४१, ३(७) व ३(५) कलमांन्वये आरोपपत्र दाखल केले होते.
लुथरांचा जामीन अर्ज न्यायालयाने मंजूर केला आहे. सविस्तर निवाडापत्र मिळाल्यावर लागू केलेल्या अटी समजणार आहेत. आता आम्ही म्हापसा पोलिसांनी नोंदवलेल्या गुन्हा प्रकरणात न्यायालयात जामीन अर्ज दाखल करणार आहोत.
- अ‍ॅड. पराग राव
बनावट एनओसी प्रकरणी आज सुनावणी
बर्च क्लबमध्ये दारू विक्रीसाठी अबकारी खात्याचा उत्पादन शुल्क परवाना मिळवण्यासाठी कांदोळी प्राथमिक आरोग्य केंद्राचा बनावट दाखला तयार केल्याप्रकरणी म्हापसा पोलिसांनी गौरव लुथरा आणि सौरभ लुथरा यांना ३० मार्च रोजी अटक केली आहे. चार दिवसांची त्यांची पोलीस कोठडी संपत असल्याने गुरुवारी त्यांना म्हापसा प्रथमश्रेणी न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे. हा बनावट दाखला कुणी तयार केला, याची माहिती त्यांनी पोलिसांना दिलेली नाही.
कांदोळी आरोग्याधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंद
कांदोळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी डॉ. रोशन नाझारेथ यांनी म्हापसा पोलिसांत १७ डिसेंबर २०२५ रोजी बनावट एनओसी संदर्भात तक्रार दिली होती. हा प्रकार १३ डिसेंबरपूर्वी अबकारी खात्याच्या म्हापसा निरीक्षक कार्यालयात घडला होता. बर्च दुर्घटनेच्या चौकशीवेळी हा फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला होता. म्हापसा पोलिसांनी संशयितांच्या जीएस हॉस्पिटॅलिटी एलएलपी या कंपनीसह सौरभ लुथरा, गौरव लुथरा व अजय गुप्ता यांच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या ३३२(२), ३३६(३), ३३८, ३४०(२), ३१८(४) व ३(५) कलमांन्वये गुन्हा नोंद केला होता.

हेही वाचा