व्यावसायिक डिझेल दरवाढीचा कदंब, ट्रॉलरधारकांना फटका

बससेवा, मत्स्यव्यवसाय अडचणीत; फेरी बोट सेवेला दिलासा


31st March, 11:47 pm
व्यावसायिक डिझेल दरवाढीचा कदंब, ट्रॉलरधारकांना फटका

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : राज्यात व्यावसायिक डिझेलचे दर वाढल्याने बससेवा आणि मत्स्य व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. कदंब डेपो आणि मच्छीमार जेटींचे स्वतःचे पेट्रोल पंप आहेत. या पेट्रोल पंपांवर व्यावसायिक (बल्क) डिझेलचा पुरवठा केला जातो. किरकोळ डिझेल दर सुमारे ८७ रुपये प्रतिलिटर असताना व्यावसायिक डिझेलचा दर ११२ रुपये प्रतिलिटरपर्यंत पोहोचल्याने कदंब बससेवा व ट्रॉलरधारक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. मात्र, फेरी बोट सेवेवर या दरवाढीचा फारसा परिणाम झालेला नाही.
व्यावसायिक बल्क डिझेलचा दर किरकोळ डिझेलच्या दरापेक्षा सुमारे २२ रुपयांनी जास्त असल्याने इंधन खर्चात मोठी वाढ झाली आहे. परिणामी, इतर कामांसाठी निधी कमी पडत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. बल्क डिझेलचा दर जास्त असल्याने खर्चाचे गणित बिघडले आहे. काही वेळा डेपोबाहेरील पंपांवरून डिझेल घ्यावे लागते, असेही कदंबच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
अखिल गोवा ट्रॉलर मालक संघटनेचे अध्यक्ष जुझे फिलिप डिसोझा यांनी सांगितले की, डिझेल दरवाढीमुळे अनेक बोटी बंद ठेवाव्या लागत आहेत. त्यामुळे मत्स्य व्यवसायावर परिणाम होऊन मासळी महाग होण्याची शक्यता आहे. इतर राज्यांत व्यावसायिक डिझेलचे दर सुमारे ७८ रुपये आहेत; पण गोव्यात आम्हाला ११२ रुपये मोजावे लागतात. हा दर परवडणारा नाही, असे जुझे फिलिप डिसोझा म्हणाले.
...
फेरी बोट सेवा सुरळीत
दरम्यान, फेरी बोट सेवेसाठी वापरल्या जाणाऱ्या डिझेलच्या दरात मोठी वाढ झालेली नसल्याने ही सेवा नियमित सुरू आहे, अशी माहिती नदी परिवहन खात्याच्या अधिकाऱ्यांनी दिली.
प्रतिलिटर दरातील तफावत
किरकोळ डिझेल : सुमारे ८७ रुपये
व्यावसायिक (बल्क) डिझेल : सुमारे ११२ रुपये
इतर राज्यांत व्यावसायिक डिझेल : सुमारे ७८ रुपये