संचित सर्वांचा आवडता; त्याने पोलिसांना बोलावल्याची वडिलांना होती सल

वडील संजय म्हापसेकर यांच्या ‘सुसाईड नोट’वरून संचितला चु​कीचे ठरविणे अयोग्य !

Story: कैलास नाईक |
just now
संचित सर्वांचा आवडता; त्याने पोलिसांना बोलावल्याची वडिलांना होती सल

गोवन वार्ता

बोर्डे (डिचोली) : येथील म्हापसेकर पिता-पुत्राच्या सोमवार दि. १६ मार्च रोजी उघडकीस आलेल्या मृत्यूप्रकरणाचे गूढ वडिलांनी लिहून ठेवलेल्या १२ पानी चिठ्ठीतून उलगडले. मुलगा वाया जाणार या भीतीने ग्रासल्यामुळेच आपण त्याचा जीव घेतला आणि नंतर आत्महत्या केली, असे संजय म्हापसेकर यांनी चिठ्ठीत लिहून ठेवले होते. त्याचा आधार घेऊन सर्वांनीच संचित याला ‘खलनायक’ ठरवून टाकले. मात्र प्रत्यक्षात तसे नाही. संचित हा मित्रमंडळी, शिक्षक तसेच परिचितांच्या वर्तुळात सभ्य म्हणून ओळखला जात होता. अभ्यासावरून वडील एकदा खूपच रागावल्यामुळे त्याने घाबरून पोलिसांना फोन केला होता. पोलिसांनी घरी येऊन वडिलांची चौकशी केल्यापासून वडील अस्वस्थ झाले होते. तेव्हापासून त्यांच्यात वाद होत असत, अशी माहिती समोर आली आहे.


प्रस्तुत प्रतिनिधीने संचित म्हापसेकरचे मित्र, कुटुंबीय, शिक्षक आदींशी संवाद साधला असता, या प्रकरणात नवी माहिती उघड झाली. मित्रांच्या घोळक्यात वावरताना संचित मितभाषी आणि अत्यंत मनमिळावू असल्याचे सगळे सांगतात. क्रिकेट खेळताना त्याच्याकडून एखादी चूक झाली आणि कोणी त्याला रागावला, तर तो निमुटपणे ऐकून घेत असे. दुरुत्तरे त्याने कधी दिलीच नाहीत. त्याला कसले व्यसनही नव्हते. शाळेतील तो अव्वल बॅडमिंटन खेळाडू होता, असे मित्रांनी सांगितले.


डिचोलीतील ज्या शांतादुर्गा विद्यालयात तो नववीत शिकत होता, तिथेही त्याचे वर्तन सामान्य होते. कोणत्याही वादात तो कधीच अडकला नाही. शिक्षकांचे त्याच्याविषयीचे मत चांगले आहे. ‘आपण बरे आणि आपले काम बरे’ इतकी त्याची सरळ, व्यवहारी वागणूक होती. अभ्यासातील प्रगतीही व्यवस्थित होती. तक्रार करण्यासारखे वर्तन त्याने कधीही केले नाही, असे शिक्षक सांगतात. संचितच्या मृत्यूनंतर त्याला चुकीचा ठरविलेल्यांनी ही वस्तुस्थिती समजून घ्यायला हवी होती, असे शिक्षकांचे मत आहे.
बहीण म्हणते, संचित निष्पाप!
भाऊ आणि वडिलांच्या मृत्यूमुळे धक्का बसलेल्या संचितच्या बहिणीशी प्रस्तुत प्रतिनिधीने संवाद साधला, तेव्हा दोघांच्याही आठवणीने ती भावूक झाली. संचित सरळमार्गी, निष्पाप, निरागस होता. अल्लड वयात स्वाभाविकपणे आपल्या वयाच्या मुलांसोबत खेळणे, मित्रांसोबत वेळ व्यतित करणे हे तो करायचा. मात्र त्याचा परिणाम अभ्यासावर होईल, या भीतीने वडील त्याला धाक दाखवत असत. त्यातून त्यांचे संबंध ताणले होते. मात्र ते टोकाला पोहोचतील असे वाटले नव्हते. वडिलांनी मला किंवा संचितला कधीही मारहाण केली नाही. माझ्या आईचा तीन वर्षांपूर्वी मृत्यू झाला. त्यानंतरही वडिलांनी आमच्याकडे व्यवस्थित लक्ष दिले. अभ्यासात संचितचे मन रमायला हवे, असे त्यांना वाटत असे. त्याच भावनेतून दोन-तीन महिन्यांपूर्वी त्यांनी संचितला दटावले होते. या प्रकारामुळे गांगरून त्याने पोलिसांना फोन केला होता. पोलिसांनी​ घरी येऊन वडिलांची आणि त्याची चौकशी केली होती. या प्रकारामुळे वडील काहीसे खचले होते. त्यांनी एका राजकीय पक्षाचा पदाधिकारी या नात्याने असलेले राजकीय, सामाजिक संबंध जवळपास तोडले होते. ते समाजात मिसळत नव्हते. मुलाच्या बाबतीत त्यांचे मन फारच हळवे, काहीसे हट्टी झाले होते. त्यातून त्यांच्यातील दुरावा वाढत होता. ज्या दिवशी ही घटना घडली, त्या दिवशी मी कामावर गेले होते. कदाचित त्यावेळी त्यांच्यात आणखी बिनसले असावे आणि त्यातून ही घटना घडली असावी. त्यातून ते कोलमडले आणि चिठ्ठीत मुलाबाबत आपल्या भावना लिहून ठेवल्या, असे सांगताना ती भावविवश झाली.
संचितला दोष देणाऱ्यांनी सत्य समजून घ्यावे!
एका बाजूला भाऊ आणि वडिलांना गमावल्याचे दु:ख, तर दुसऱ्या बाजूला आपल्या भावाची मृत्यूपश्चात होणारी बदनामी अशा दुहेरी मानसिक कोंडीत संचितची बहीण सापडली आहे. संचितविषयी कोणाचीही तक्रार नव्हती. मलाही त्याचे वागणे कधी खटकले नाही. फक्त वडिलांना त्याच्याकडून ज्या अपेक्षा होत्या, त्या पूर्ण होत नसल्यामुळे त्यांचे वाद होत असत. पण केवळ वडिलांनी​ चिठ्ठीत केलेल्या नोंदींचा आधार घेऊन काहीनी संचितची चुकीची प्रतिमा उभी केली. संचितच्या कथित चुकीच्या वागण्यामुळे वडिलांना हे पाऊल उचलावे लागले, असा अपप्रचार करणाऱ्यांनी वस्तुस्थिती जाणून घ्यायला हवी होती, असे तिने सांगितले.