अमेरिकेत ट्रम्प यांच्याविरोधात लाखो लोक रस्त्यावर

‘नो किंग्ज’अंतर्गत हजारो ठिकाणी निदर्शने; लॉस एंजेलिसमध्ये पोलिसांसोबत झटापट


29th March, 11:45 pm
अमेरिकेत ट्रम्प यांच्याविरोधात लाखो लोक रस्त्यावर

न्यूयॉर्कच्या टाईम्स स्क्वेअर परिसरात निदर्शने करताना आंदोलक.
...
न्यूज डेस्क। गोवन वार्ता
वॉशिंग्टन : अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या विरोधात ३,३०० हून अधिक ठिकाणी झालेल्या ‘नो किंग्स रॅली’मध्ये सुमारे ८० लाख लोक रस्त्यावर उतरले. आंदोलकांनी ट्रम्प सरकारच्या अनेक धोरणांवर नाराजी व्यक्त केली. त्यांचा राग विशेषतः इराणसोबत वाढलेला तणाव, कठोर इमिग्रेशन कारवाई आणि वाढत्या महागाईबद्दल होता. आंदोलकांनी ट्रम्प आणि उपराष्ट्रपती जेडी वेंस यांच्या विरोधात घोषणाबाजी केली आणि त्यांना पदावरून हटवण्याची मागणी केली.
केवळ अमेरिकेतच नाही, तर जगाच्या इतर भागांमध्येही या अांदोलनाचे लोण पसरले. पॅरिस, लंडन आणि लिस्बनसारख्या शहरांमध्येही लोकांनी रस्त्यावर उतरून ट्रम्प यांच्याविरोधात निदर्शने केली. त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. व्हाईट हाऊसने या आंदोलनाला ‘थेरपी सेशन’ असे संबोधले. सामान्य लोकांवर या आंदोलनामुळे फारसा फरक पडत नाही. आंदोलनावर प्रतिक्रिया व्यक्त करताना ट्रम्प म्हणाले की, त्यांचे निर्णय देशाला मजबूत करण्यासाठी आहेत. ते ‘राजा’ नाहीत आणि त्यांच्यावर आंदोलकांकडून केले जात असलेले आरोप चुकीचे आहेत.
ठळक घडामोडी
राजधानी वॉशिंग्टन डीसीमध्ये ‘नो किंग्स’ आंदोलनात सहभागी लोकांनी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रतिकात्मक पुतळा हाती घेऊन निषेध व्यक्त केला.
फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये एक महिला ‘स्टॅच्यू ऑफ लिबर्टी’च्या वेशात आंदोलनात सहभागी झाली होती.
इटलीची राजधानी रोममध्ये आंदोलकांनी इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू, इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी आणि डोनाल्ड ट्रम्प यांचे पोस्टर हाती घेऊन निदर्शने केली.
अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये अांदोलक हिंसक बनले. तेथे आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. अनेकांना अटकही करण्यात आली.
ओरेगन राज्यातील पोर्टलैंड येथे निदर्शकांनी अमेरिकेचा राष्ट्रध्वज जाळल्यामुळे वातावरण तणावपूर्ण होते.
वॉशिंग्टन डीसीमध्ये लिंकन मेमोरियल आणि नॅशनल मॉल परिसरात जमून लोकांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली.
शिकागोमध्ये महापौरांसह हजारो लोक रस्त्यावर उतरले आणि ‘ट्रम्प हटाओ’च्या घोषणा दिल्या.
न्यूयॉर्कच्या टाईम्स स्क्वेअर आणि मॅनहॅटन परिसरात मोठ्या संख्येने लोक जमले. गर्दी वाढल्यामुळे पोलिसांना अनेक रस्ते बंद करावे लागले.
मिनेसोटाच्या मिनियापोलिस आणि सेंट पॉलमध्ये दोन लाख लोक आंदोलनात सहभागी झाले.