बाजारात एप्रिलपर्यंत आंब्यांची मोठी आवक : कृषी खात्याच्या अधिकाऱ्यांची माहिती

पणजी : गोव्यात यंदा आंब्याचे पीक समाधानकारक आले असले, तरी काजूच्या पिकाला मात्र हवामान बदलाचा मोठा फटका बसला आहे. कृषी खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आंबे आता हळूहळू बाजारात येऊ लागले असून एप्रिल महिन्यापर्यंत बाजारपेठा आंब्यांनी पूर्णपणे भरून जातील. आंब्याचे पीक आतापर्यंत तरी चांगले आहे, मात्र काजूच्या उत्पादनात घट झाली असून उशिरा येणाऱ्या पिकाचेही नुकसान झाले आहे.
काजूच्या पिकाबाबत माहिती देताना अधिकाऱ्यांनी सांगितले की, काजूला साधारणपणे तीन टप्प्यांत मोहोर येतो. पहिल्या टप्प्यात पीक चांगले आले असले, तरी दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील मोहोरावर हवामान बदलाचा विपरीत परिणाम झाला, ज्यामुळे एकूण उत्पादनात घट झाली आहे. याउलट आंब्याला एकदाच मोहोर येत असल्याने आणि आतापर्यंत स्थिती अनुकूल असल्याने बागायतदार आणि व्यापाऱ्यांनी पिकाबाबत समाधान व्यक्त केले आहे. कृषी खात्याने आयोजित केलेल्या आंबा बागायती लिलावालाही यंदा मोठा प्रतिसाद मिळाला आहे.
राज्यातील अनेक आंब्याच्या बागायती भाडेतत्त्वावर चालवण्यास देण्यात आल्या असून, त्यातून यंदा चांगला महसूल आणि नफा मिळण्याची शक्यता आहे. कुळे, केरी, म्हापसा, पेडणे, वाळपई आणि मडगाव यांसारख्या सात महत्त्वाच्या ठिकाणच्या सरकारी बागायतींचा यामध्ये समावेश आहे. या बागायती घेतलेल्या शेतकऱ्यांनी पिकाबाबत सकारात्मक प्रतिक्रिया दिली असून, एप्रिल महिन्यात हंगाम पूर्ण जोमाने सुरू झाल्यावर आंब्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.
सद्यस्थितीत आंब्याला कोणताही मोठा नैसर्गिक फटका बसलेला नाही, त्यामुळे पुढील काळात दर्जेदार उत्पादन हाती येण्याची चिन्हे आहेत. काजू उत्पादकांना मात्र या हंगामात फटका बसला असून, हवामान बदलामुळे त्यांच्या उत्पन्नावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.