परप्रांतीय, विदेशी नागरिकांच्या प्रमाणातही वाढ

पणजी : गोव्यात अमली पदार्थांच्या संबंधित गुन्ह्यांमध्ये स्थानिकांचा सहभाग चिंताजनकरित्या वाढत असल्याचे समोर आले आहे. २०२१ ते २०२५ या पाच वर्षांच्या कालावधीत अमली पदार्थ प्रकरणात अटक झालेल्या स्थानिकांची संख्या दुप्पटीहून अधिक वाढली आहे. केवळ स्थानिकच नव्हे, तर याच काळात परप्रांतीय आणि विदेशी नागरिकांच्या अटकेचे प्रमाणही वाढले असून, पोलिसांनी अमली पदार्थांविरोधात मोठी मोहीम राबवल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.
पोलीस प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, २०२१ मध्ये अमली पदार्थांच्या १२१ खटल्यांत १३८ जणांना अटक करण्यात आली होती, ज्यात २९ स्थानिक नागरिक होते. २०२५ मध्ये हा आकडा वाढून १६३ खटल्यांत २१३ अटकेपर्यंत पोहोचला असून, यामध्ये ७६ स्थानिक नागरिकांचा समावेश आहे. मागील पाच वर्षांत पोलिसांनी एकूण १४६ किलो अमली पदार्थ नष्ट केले आहेत, ज्यातील सर्वाधिक ७५ किलो अमली पदार्थ एकट्या २०२५ मध्ये नष्ट करण्यात आले आहेत.
| वर्ष | स्थानिक (Goans) | अन्य राज्यातील | विदेशी | एकूण अटक |
|---|---|---|---|---|
| २०२१ | २९ | ८७ | २२ | १३८ |
| २०२२ | ५७ | १०४ | २९ | १९० |
| २०२३ | ४७ | ९८ | २१ | १६५ |
| २०२४ | ५५ | ११३ | २४ | १९२ |
| २०२५ | ७६ | १०५ | ३२ | २१३ |
मागील पाच वर्षांतील एकूण ८९८ आरोपींच्या विश्लेषणातून असे दिसून आले आहे की, अटक झालेल्यांपैकी २९.४० टक्के (२६४ जण) स्थानिक नागरिक होते. सर्वाधिक ५६.४५ टक्के (५०७ जण) आरोपी अन्य राज्यांतील होते, तर १४.२५ टक्के (१२८ जण) विदेशी नागरिक होते. स्थानिकांच्या वाढत्या सहभागामुळे अमली पदार्थांच्या विरोधातील जनजागृती अधिक व्यापक करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.