आर्थिक सर्वेक्षण अहवाल : राज्यातील बँक ठेवींनी ओलांडला १.२९ लाख कोटींचा टप्पा

पणजी : मागील पाच वर्षांत राज्यातील विविध क्षेत्रातील कर्ज वितरणात १३ हजार १७५ कोटी रुपयांची वाढ झाली आहे. आर्थिक सर्व्हेक्षण अहवालातून ही माहिती मिळाली आहे. यानुसार २०२१-२२ मध्ये सप्टेंबर २०२२ अखेरीस राज्यातील विविध बँका आणि लघु वित्तीय संस्थांनी ३० हजार ६०९ कोटींचे कर्ज वितरित केले होते. २०२५-२६ या आर्थिक वर्षात सप्टेंबर २०२५ अखेरीस ४३ हजार ७८४ कोटी रुपये कर्ज वितरित करण्यात आले. पाच वर्षांत राज्यातील कर्ज वितरणात ४३ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
अहवालानुसार, आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये ३० हजार ७६९ कोटी, २०२३-२४ मध्ये ३५ हजार ७२९ कोटी, २०२४-२५ मध्ये ३९ हजार ६३० कोटी रुपये कर्ज वितरित करण्यात आले आहे. वरील कालावधीत एकूण वितरित कर्जांपैकी ६०.९८ टक्के कर्ज राष्ट्रीयकृत बँकांनी दिले आहे. २९.७६ टक्के कर्ज खासगी बँकांनी, ८.८३ टक्के सहकारी बँकांनी, तर ०.४३ टक्के कर्ज लघु वित्तीय संस्थांनी दिले आहे.
राष्ट्रीयकृत बँकांमध्ये स्टेट बँकेने सर्वाधिक १० हजार ८५३ कोटी रुपयांचे कर्ज दिले आहे. तर कॅनडा बँकेने ३१९७ कोटी रुपये कर्ज दिले आहे. खासगी बँकांमध्ये एचडीएफसी बँकेने ५१९२ कोटी रुपये, तर आयसीआयसीआय बँकेने २,८३९ कोटी रुपये कर्ज दिले आहे. सहकारी क्षेत्रात गोवा राज्य सहकारी बँकेतर्फे सर्वाधिक कर्जे देण्यात आली आहेत.
सीडी रेशोमध्ये सुधारणा
राज्यात एका वर्षात बँकांचे कर्ज आणि ठेवींचे गुणोत्तर (सीडी रेशो) वाढले आहे. सप्टेंबर २०२४ अखेरीस राज्यातील बँकांचा सीडी रेशो ३२.६६ टक्के होते. सप्टेंबर २०२५ अखेरीस तो १.०२ टक्क्यांनी वाढून ३३.६८ टक्के झाला. यादरम्यान राष्ट्रीयकृत बँक आणि लघु वित्तीय संस्थांचा सीडी रेशो वाढला. तर खासगी आणि सहकारी बँकांचा कमी झाला आहे.
बँकांतील ठेवींमध्ये ३६ हजार कोटींची वृद्धी
अहवालानुसार वरील पाच वर्षांच्या कालावधीत राज्यातील विविध बँक खात्यातील ठेवींमध्ये ३६ हजार ३७० कोटी रुपयांची वाढ झाली आहे. ३० सप्टेंबर २०२१ मध्ये राज्यातील बँक खात्यात ९३ हजार ६१८ कोटी रुपयांच्या ठेवी होत्या. ३० सप्टेंबर २०२५ मध्ये त्या वाढून १.२९ लाख कोटी रुपये झाल्या. पाच वर्षांत ठेवींचे प्रमाण ३८.९४ टक्क्यांनी वाढले आहे. सप्टेंबर २०२५ अखेरीस एसबीआयमध्ये सर्वाधिक २६ हजार ५२८ कोटी, तर एचडीएफसी बँकेत १५ हजार ६२० कोटी तर राज्य सहकारी बँकेत २४६४.४६ कोटी रुपयांच्या ठेवी होत्या.