चोरीप्रकरणातील तीन संशयितांची निर्दोष मुक्तता

तक्रारदारासोबत तडजोडीनंतर न्यायालयाचा निकाल

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
16 mins ago
चोरीप्रकरणातील तीन संशयितांची निर्दोष मुक्तता

मडगाव : येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी सबिनो एड्रियन ब्रागांझा यांनी २०१८ मधील चोरीप्रकरणात तीन संशयितांची निर्दोष मुक्तता केली. या प्रकरणातील पीडित तक्रारदार व्यक्तीने प्रकरणाची तडजोड करण्याची तयारी दर्शवल्याने आणि ठोस पुराव्याअभावी हा निर्णय देण्यात आला.

सदर चोरीचे प्रकरण हे २०१८ मधील असून, संशयितांविरोधात घरफोडी आणि चोरी अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला होता. या प्रकरणात संशयित वासीम मोहम्मद हा कोलवाळ मध्यवर्ती कारागृहात होता तर संशयित समीर फुरकान व सनी हे दोघे फरार होते. या खटल्याच्या सुनावणी दरम्यान, पीडित नीरज रायकर यांनी न्यायालयात अर्ज सादर केला व व्यवसायातील व्यस्ततेमुळे न्यायालयात वारंवार उपस्थित राहणे शक्य नसल्याचे त्यांनी अर्जात नमूद केले. ही कलमे कायद्यानुसार आपापसात मिटवण्यासारखी नसली तरी, सर्वोच्च न्यायालयाच्या एका खटल्याचा संदर्भ देत न्यायालयाने तडजोडीला परवानगी दिली. या प्रकरणात आतापर्यंत तपास अधिकारी आणि इतर साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली होती. मात्र, पीडिताने तडजोड केल्याने तपासात कोणतेही ठोस पुरावे उरले नाहीत. परिणामी, न्यायालयाने तिन्ही संशयितांची निर्दोष मुक्तता केली.

सहा वर्षांपासून प्रलंबित प्रकरणाचा निकाल

न्यायालयाने जप्त केलेल्या मुद्देमालातील सॅमसंग मोबाईल फोन संशयित वासीम मोहम्मद याला परत करण्याचे निर्देश दिले. रोख रक्कम व विदेशी चलन सरकारी तिजोरीत जमा करण्याचे आदेश दिले. गुन्ह्यात वापरलेले इतर साहित्य जसे स्क्रू ड्रायव्हर, लोखंडी रॉड इतर नष्ट करण्याचे आदेश दिले आहेत. या निकालामुळे गेल्या सहा वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या प्रकरणाचा अखेर निकाल लागला. 

हेही वाचा