नागरी पुरवठा खात्याची कारवाई; तिघांवर एफआयआर दाखल

पणजी : राज्यात गॅस सिलिंडर गैरव्यवहार प्रकरणात नागरी पुरवठा व ग्राहक व्यवहार खात्याने मोठी कारवाई करत आतापर्यंत ४२ सिलिंडर जप्त केले असून, तिघांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, राज्यात गॅस पुरवठा सुरळीत असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.१ मार्चपासून नागरी पुरवठा खात्याने राज्यातील विविध भागांत १७८ ठिकाणी तपासणी केली. या मोहिमेत एकूण ४२ सिलिंडर जप्त करण्यात आले, ज्यामध्ये ३८ व्यावसायिक आणि ४ घरगुती सिलिंडरचा समावेश आहे. वास्को येथे एका वाहनात आणि पर्वरी येथील रेस्टॉरंटमध्ये घरगुती सिलिंडरचा व्यावसायिक वापर होत असल्याचे उघड झाले. तसेच व्यावसायिक सिलिंडरमधून गॅस चोरीचे प्रकारही समोर आले आहेत.
व्यावसायिक ग्राहकांसाठी सध्या एकूण कोट्यापैकी २० टक्के कोटा दिला जात आहे. केंद्राकडून नवीन मार्गदर्शक तत्त्वे आल्यास या कोट्यात वाढ केली जाईल. तसेच, ज्या भागात पाईप गॅस (पीएनजी) पुरवठा सुरू झाला आहे, अशा ग्राहकांना त्यांचे सिलिंडर सरेंडर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
गॅस सिलिंडरची चढ्या दराने विक्री किंवा काळाबाजार होत असल्याचे आढळल्यास नागरिकांनी त्वरित खात्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. यासाठी खात्याने हेल्पलाईन क्रमांक जारी केला असून, यापुढेही अशा धाडी सुरूच राहतील, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.
पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी विशेष दक्षता
- गॅस सिलिंडरचा पुरवठा विनाअडथळा व्हावा यासाठी सरकारने विशेष पावले उचलली आहेत. राज्यातील ५३ गॅस एजन्सींवर लक्ष ठेवण्यासाठी खात्याने विशेष अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे.
- सिलिंडर थेट ग्राहकांच्या घरापर्यंत पोहोचवण्याची सुविधा सुरू आहे. एजन्सीवर जाऊन सिलिंडर नेण्याची पद्धत सध्या बंद ठेवण्यात आली आहे.
- पूर्वी नोंदणीनंतर १५ दिवसांत मिळणारा सिलिंडर आता साधारण २५ दिवसांनी मिळत असला, तरी पुरवठा साखळी सुरळीत असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.