कार-दुचाकीत जोरदार धडक : मृत युवक झुआरीनगरचे

वास्को : कुएली–वेर्णा अंतर्गत रस्त्यावर रविवारी संध्याकाळी एक भीषण अपघात घडला. झुआरीनगर येथील दोन तरुणांची दुचाकी समोरून येणाऱ्या ‘इनोव्हा’ला धडकली. या अपघातात दोघांचाही जागीच मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे नव्याने डांबरीकरण केलेल्या रस्त्यांवर होणाऱ्या अतिवेगाबाबत पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली जात आहे.
व्यंकटेश बासर (वय २१) आणि राकेश संकप्पणावर (वय २४) अशी मृत तरुणांची नावे आहेत. ते दोघेही झुआरीनगरचे रहिवासी होते. ते ‘ॲक्सेस’ दुचाकीवरून झुआरीनगरहून वेर्णाकडे जात असताना समोरून पर्यटकांना घेऊन येणाऱ्या ‘इनोव्हा’ला त्यांची दुचाकी जोरात धडकली. धडक इतकी तीव्र होती की, दोन्ही दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले आणि त्यांनी घटनास्थळीच प्राण गमावले.
घटनेची माहिती मिळताच समाजसेवक रोक्विझिन्हो डिसोझा घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सांगितले की, रस्त्याची नुकतीच सुधारणा झाली असली तरी त्याचा वापर बेपर्वाईने वाहन चालवण्यासाठी होऊ नये.
पूर्वी या रस्त्याची अवस्था अत्यंत खराब होती आणि त्यामुळे अपघातांची भीती व्यक्त केली जात होती. स्थानिक रहिवाशांच्या वारंवार मागणीनंतर विशेषतः‘रेमेडियस चर्च’च्या ‘थ्री किंग्स’ उत्सवापूर्वी या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले. मात्र, सुधारित रस्त्यावर अतिवेगाने वाहन चालविण्यात येत आहेत. झुआरीनगर ते वेर्णा हा रस्ता अनेकदा ‘शॉर्टकट’ म्हणून वापरला जातो, त्यामुळे वाहनचालकांनी विशेष काळजी घ्यावी, असेही त्यांनी सांगितले.
अपघातानंतर काही वेळातच वेर्णा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला असून, अपघाताचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे.
आमदार वाझ यांची घटनास्थळी भेट
स्थानिक आमदार आंतोन वाझ यांनीही घटनास्थळी भेट देऊन वाहनचालकांना संयम बाळगण्याचे आवाहन केले. रस्ता नव्याने डांबरीकरण करण्यात आला असला तरी तो अरुंद आहे आणि दोन्ही बाजूंना दाट झाडी आहे. त्यामुळे या अंतर्गत रस्त्यावर वाहन चालवताना विशेष सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले.