फोंडा पोटनिवडणुकीत आरजीचा उमेदवार नाही : मनोज परब

काँग्रेस उमेदवाराला पाठिंबा : विश्वासात न घेतल्यामुळे कार्यकर्ते काँग्रेसवर नाराज


37 mins ago
फोंडा पोटनिवडणुकीत आरजीचा उमेदवार नाही : मनोज परब

पत्रकार परिषदेत बोलताना आरजी प्रमुख मनोज परब. सोबत आमदार वीरेश बोरकर व इतर.
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : भाजपचा पराभव व्हावा आणि गोव्याचे हित जपले जावे या हेतूने फोंडा पोटनिवडणुकीत उमेदवार न उतरवण्याचा निर्णय रिव्हॉल्युशनरी गोवन्स (आरजी) पक्षाने घेतला आहे. पोटनिवडणुकीत आम्ही काँग्रेसला पाठिंबा देणार आहोत, असे आरजीचे प्रमुख मनोज परब यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले. उमेदवार जाहीर करताना आमच्याशी चर्चा न केल्याबद्दल त्यांनी काँग्रेसवर प्रखर टीकाही केली. भविष्यात काँग्रेसने आरजीला गृहित धरू नये, असा इशाराही परब यांनी यावेळी दिला. दरम्यान, काँग्रेसचे उमेदवार डॉ. केतन भाटीकर आणि भाजपचे उमेदवार रितेश नाईक सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
फोंडा मतदारसंघात पोटनिवडणुकीसाठी ९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. ४ मे रोजी मतमेजणी होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे. पोटनिवडणुकीत उमेदवार द्यावा की नाही, याविषयी निर्णय घेण्यासाठी आरजी पक्षाची शनिवारी बैठक झाली. दिवसभर चाललेल्या या बैठकीत फोंडा मतदारसंघात आरजीचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी निवडणूक लढवावी, असा विचार बहुसंख्य पदाधिकाऱ्यांनी बोलून दाखवला. उमेदवारी जाहीर करण्यापूर्वी काँग्रेसने आरजी पक्षाशी चर्चा केली नाही म्हणून अनेकांना संतापही व्यक्त केला. तरीही भाजपचा पराभव करण्यासह गोव्याचे हित लक्षात घेऊन उमेदवार न उतरवण्याचा निर्णय पक्षाने घेतला. भाजपच्या पराभवासाठी उमेदवार जाहीर करण्यापूर्वी काँग्रेसने आमच्याशी चर्चा करण्याची गरज होती; मात्र उमेदवार जाहीर केल्यानंतर त्यांनी चर्चेची तयारी दाखवली. काँग्रेसची ही कृती अयोग्य आहे. विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आरजीला गृहित धरू नये, असा इशाराही मनोज परब यांनी दिला.
युतीविषयी निर्णय घेण्यासाठी आरजीची समिती
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी युतीविषयी निर्णय घेण्यासाठी आरजी पक्ष समिती स्थापन करणार आहे. ही समिती अन्य पक्षांशी चर्चा करण्यासह निर्णय घेईल, असे आरजीचे आमदार वीरेश बोरकर यांनी सांगितले. फोंडा पोटनिवडणुकीनंतर अन्य पक्षांशी युतीविषयी चर्चा सुरू होईल. युतीविषयीचा निर्णय घेण्यासाठी वेळेची मर्यादा घातली जाईल, असे वीरेश बोरकर यांनी सांगितले.
रितेश, डॉ. केतन, गीतेश आज भरणार अर्ज
फोंडा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखरेच्या दिवशी, म्हणजे सोमवारी भाजपचे उमेदवार रितेश नाईक आणि काँग्रेसचे डॉ. केतन भाटीकर उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. उमेदवारी अर्ज भरताना गर्दी टाळण्यासाठी निवडणूक आयोगाने काही निर्बंध घातले आहेत. त्यामुळे उमेदवारांना अर्ज भरताना शक्तीप्रदर्शन करता येणार नाही. भाजपचे विश्वनाथ दळवी यांनी अपक्ष न लढता रितेश नाईक यांनाच पाठिंबा जाहीर केला आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेतल्याचे दळवी यांनी सांगितले. भाजपचे रितेश नाईक, काँग्रेसचे डॉ. केतन भाटीकर आणि आम आदमी पक्षाचे (आप) गीतेश नाईक यांचा प्रचार जोरात सुरू आहे. आमचा प्रचार जोरात सुरू आहे. आम्हाला मतदारांकडून प्रतिसादही चांगला मिळत आहे, असे डॉ. केतन भाटीकर यांनी सांगितले.
फोंडा पोटनिवडणुकीत उमेदवार उभा न करण्याच्या आरजीच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. आरजीच्या या निर्णयामुळे भाजपचा पराभव करण्यासाठी काँग्रेसला बळ मिळणार आहे.
_ माणिकराव ठाकरे, गोवा प्रभारी, काँग्रेस