पिकावर संक्रांत : उत्पादन घटले; केवळ साखळी, डिचोलीत उपद्रव नाही

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : रानटी जनावरांच्या वाढत्या उपद्रवामुळे अननस पिकाला मोठा फटका बसत असल्याची माहिती कृषी संचालनालयाने दिली आहे. राज्यातील बहुतांश भागात पिकांची मोठ्या प्रमाणात हानी होत असून केवळ साखळी आणि डिचोली क्षेत्रांमध्येच उत्पादनात वाढ नोंदवली गेली आहे.
संचालनालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यात एकूण २३४ हेक्टर क्षेत्रात अननसाची लागवड केली जाते. यापैकी सुमारे ६६ टक्के उत्पादन फोंडा तालुक्यात होते. मात्र सध्या या पिकावर रानटी जनावरांचा मोठा आघात होत आहे. म्हापसा आणि तिसवाडी वगळता इतर सर्व क्षेत्रांमध्ये अननसाचे पीक घेतले जाते. मुरगाव येथे ३ हजार चौ.मी. क्षेत्रातील पिकावर जनावरांचा हल्ला होत आहे. केपे येथील ७,९०६ चौ.मी. आणि सत्तरी २ हेक्टर भागात रानडुक्कर व इतर जनावरांमुळे मोठे नुकसान झाले आहे. ही जनावरे शेतात घुसून पिके मुळासकट उखडून टाकतात, तसेच फळधारणेच्या वेळी फळांचे नुकसान करतात.
रानटी जनावरांच्या सततच्या हल्ल्यांमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असून भविष्यात अननस लागवडीबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
फोंडा, सांगे, धारबांदोडा सर्वाधिक प्रभावित
धारबांदोडा येथे १६ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले असून सांगे येथे ३२ हेक्टर क्षेत्रावर रानटी जनावरे आणि हवामान बदलाचा परिणाम झाला आहे. मडगावमध्ये ३८०० चौ. मीटर क्षेत्रातील पिकावरही जनावरांनी हल्ला केला आहे. फोंडा तालुक्यातील १५५ हेक्टर क्षेत्रातील अननस पीक धोक्यात आले आहे. काणकोण येथे १५ हेक्टर क्षेत्रात लागवड असली तरी सततच्या हल्ल्यांमुळे शेतकरी नव्याने लागवड करण्यासही कचरू लागले आहेत.
पेडणे, साखळी, डिचोलीत स्थिती बरी
पेडणे येथे ४ हेक्टर क्षेत्रात अननस पीक घेतले जात असून सध्या मोठे नुकसान नोंदले गेलेले नाही. साखळी येथे उत्पादन स्थिर आहे, तर डिचोली भागात २०२०-२१ च्या तुलनेत २०२५-२६ मध्ये हळूहळू वाढ नोंदली गेली आहे.