भाजपकडून रितेश रवी नाईक

फोंडा पोटनिवडणूक : आपतर्फे गीतेश नाईक यांना उमेदवारी

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
36 mins ago
भाजपकडून रितेश रवी नाईक

फोंडा : फोंडा पोटनिवडणुकीसाठी भाजपतर्फे रितेश नाईक व आपतर्फे गीतेश नाईक यांच्या नावाची घोषणा गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर करण्यात आली आहे. काँग्रेसतर्फे यापूर्वीच केतन भाटीकर यांच्या नावाची घोषणा केली होती. रितेश नाईक यांना उमेदवारी जाहीर केल्यामुळे नगरसेवक विश्वनाथ दळवी कोणती भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी​ दळवी यांची भेट घेऊन चर्चा केली.
भाजपतर्फे रितेश रवी नाईक यांच्या नावाची घोषणा गुरुवारी सकाळी करण्यात आली. त्यानंतर काही वेळात आपचे उमेदवार गितेश नाईक यांच्या नावाची घोषणा सुद्धा करण्यात आली. त्यामुळे पोटनिवडणुकीत तीनपेक्षा अधिक उमेदवार रिंगणात उतरण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. भाजप तिकीट जाहीर झाल्यानंतर रितेश नाईक यांनी फोंडा येथील झरेश्वर देवस्थानात जाऊन आशीर्वाद घेतला. त्यावेळी नगराध्यक्ष वीरेंद्र ढवळीकर, नगरसेवक रॉय नाईक, आनंद नाईक, रूपक देसाई, सरपंच नावेद तहसीलदार व अन्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना रितेश नाईक यांनी फोंडा पोटनिवडणुकीसाठी तिकीट जाहीर केल्याबद्दल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत प्रदेशाध्यक्ष दामू नाईक व अन्य भाजप नेत्यांनी दाखवलेल्या विश्वासाबद्धल आभार व्यक्त केले. फोंडा मतदारसंघात स्व. रवी नाईक यांची उणीव असली तरी कार्यकर्ते मोठ्या जोमाने काम करणार आहेत. मतदारसंघात भाजपचा विजय निश्चित आहे. कुर्टी पंचायत व फोंडा पालिका क्षेत्रातील मतदारांच्या गाठीभेटी घेण्याचे काम सुरूच होते. त्याचा निश्चित फायदा होईल, असेही रितेश नाईक यांनी सांगितले.
नगराध्यक्ष वीरेंद्र ढवळीकर म्हणाले माजी मंत्री स्व. रवी नाईक यांनी केलेल्या कार्याची संपूर्ण माहिती मतदारसंघातील लोकांना आहे. त्याचा लाभ येत्या पोटनिवडणुकीत रितेश नाईक यांना होणार आहेत. भाजप कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने मतदारांशी संपर्क करीत असून, रितेश नाईक यांचा विजय निश्चित असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी नगरसेवक रॉय नाईक यांनीही भाजप उमेदवार रितेश नाईक यांचा विजय निश्चित मनाला जात आहे. त्यामुळे विरोधकांची भीती नसल्याचे सांगितले.
‍रितेश-केतन सोमवारी भरणार उमेदवारी अर्ज
भाजपचे उमेदवार रितेश नाईक आणि काँग्रेसचे उमेदवार डॉ. केतन भाटीकर हे दोन्ही प्रमुख प्रतिस्पर्धी येत्या सोमवारी, २३ मार्च रोजी आपले उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. उमेदवारी अर्ज भरण्याचा हा शेवटचा दिवस असल्याने दोन्ही पक्षांकडून जोरदार शक्तिप्रदर्शनाची तयारी सुरू आहे.

काँग्रेसची प्रचाराला सुरुवात
काँग्रेसचे उमेदवार डॉ. केतन भाटीकर यांनी आपली उमेदवारी जाहीर झाल्यापासून मतदारसंघात प्रचाराचा धडाका लावला आहे. सोमवारी २३ रोजी पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि समर्थकांच्या उपस्थितीत मी माझा उमेदवारी अर्ज सादर करणार आहे, अशी माहिती डॉ. भाटीकर यांनी दिली आहे.

भाजपमध्ये उत्साह

भाजपचे उमेदवार रितेश नाईक सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे प्रदेश भाजप अध्यक्ष दामू नाईक यांनी स्पष्ट केले आहे. सत्ताधारी भाजपसाठी ही जागा प्रतिष्ठेची असून, कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे.

प्रशासकीय तयारी पूर्ण
फोंडा पोटनिवडणूक जाहीर झाल्यापासून सोमवारपासून अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. फोंडा येथील सरकारी इमारत संकुलात निवडणूक अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून, २३ मार्च रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज स्वीकारले जातील. त्यानंतर अर्जांची छाननी होऊन प्रचाराचा मुख्य टप्पा सुरू होईल.

फोंडा भाजपमध्ये उमेदवारीवरून रणकंदन
फोंडा पोटनिवडणुकीसाठी भाजपने रितेश नाईक यांना उमेदवारी दिल्याने पक्षात मोठी फूट पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या निर्णयामुळे नाराज झालेल्या कार्यकर्त्यांनी निष्ठावंत कार्यकर्ते विश्वनाथ दळवी यांच्या निवासस्थानी धडक देऊन त्यांना अपक्ष निवडणूक लढवण्याची विनंती केली आहे. परिस्थिती हाताळण्यासाठी प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, माजी खासदार विनय तेंडुलकर आणि सिद्धार्थ कुंकळ्येकर यांनी दळवी यांची भेट घेतली. दोन दिवसांत वादावर तोडगा निघेल, असा विश्वास नेत्यांनी व्यक्त केला असला तरी कार्यकर्त्यांनी दळवींनाच तिकीट देण्याचा आग्रह धरला आहे. या पेचप्रसंगावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत लवकरच मध्यस्थी करण्याची शक्यता असून, दळवी सोमवारी अपक्ष अर्ज भरण्याच्या तयारीत आहेत.   

उमेदवाराबाबत आरजीकडून अद्याप निर्णय नाही;
काँग्रेसकडून समर्थनासाठी चर्चा
फोंडा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असून रिव्होल्युशनरी गोवन्स पक्षाने (आरजी) अद्याप उमेदवार जाहीर केलेला नाही. दरम्यान, भाजपाचा पराभव करण्यासाठी काँग्रेसने आरजीकडून पाठिंबा मिळवण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.
काँग्रेसचे प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी सांगितले की, भाजपचा पराभव करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असून, यासाठी आरजीशी चर्चा केली जात आहे. प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर यांनीही निवडणूक समितीमार्फत आरजीशी संवाद सुरू असल्याचे स्पष्ट केले.

आरजीचे नेते मनोज परब यांनी सांगितले की, पक्षाच्या निवडणूक समितीची बैठक झाल्यानंतर उमेदवारीबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल. सध्या तरी उमेदवाराबाबत कोणताही निर्णय झालेला नाही.