जुने गोवा पोलिसांकडून अज्ञात मोबाईलधारकाविरुद्ध गुन्हा दाखल

पणजी : ‘अॅगोडा’ या पर्यटन एजन्सीचा अधिकारी असल्याचे भासवून तिसवाडीतील ज्येष्ठ नागरिकाला अॅप डाऊनलोड करण्यास भाग पाडून ३.४८ लाखांचा गंडा घालण्यात आला. या प्रकरणी जुने गोवा पोलिसांनी अज्ञात मोबाईलधारकाविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
जुने गोवा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी ज्येष्ठ नागरिकाच्या मुलींनी १८ मार्च २०२६ रोजी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, १६ मार्च रोजी सायं. ६ वाजता तक्रारदाराच्या वडिलांला अज्ञात व्यक्तीकडून फोन आला. त्यावेळी सदर व्यक्तीने त्याला अॅगोडा या पर्यटन एजन्सीचे अधिकारी असल्याचे भासवले. तसेच त्याला त्याच्या मोबाईलवर अॅप डाऊनलोड करण्यास भाग पाडले. त्यावेळी सदर संशयित व्यक्तीने त्याच्याकडून त्याच्या बँकेशी निगडित महत्त्वाची माहिती घेतली. या माहितीची वापर करून संशयिताने त्याच्या बँक खात्यातून ३ लाख ४८ हजार ४५९ रुपये गायब केले, अशी माहिती तक्रारीत नमूद करण्यात आली.
अलीकडच्या काळात अशा प्रकारच्या ऑनलाईन फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना लक्ष्य करून फसवणूक करणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. नागरिकांनी अनोळखी कॉल, अॅप डाउनलोड किंवा बँक माहिती देताना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या तक्रारीची दखल घेऊन जुने गोवा पोलिसांनी अज्ञात मोबाईलधारकाविरोधात भारतीय न्याय संहितेचे कलम ३१८(४) आणि ३१९(२) अंतर्गत गुन्हा दाखल केला. या प्रकरणी निरीक्षक गौरीश मळीक याच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दीप्तराज गावडे पुढील तपास करत आहे.