इस्रायलचा दावा; इराणकडून तीव्र निषेध, संघर्ष चिघळला

तेहरान : मध्यपूर्वेतील युद्ध आता अधिक भीषण वळणावर पोहोचले असून, इस्रायलने नुकत्याच केलेल्या हवाई हल्ल्यात इराणचे गुप्तचर मंत्री इस्माईल खतीब यांचा मृत्यू झाला आहे. इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी या वृत्ताला अधिकृत दुजोरा दिला असून, या घटनेमुळे संपूर्ण इराणमध्ये शोककळा पसरली आहे.
इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्त्रायल काट्झ यांनी तेहरानमधील या कारवाईची जबाबदारी स्वीकारली आहे. पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू यांच्या संमतीने इराणच्या वरिष्ठ नेतृत्वावर थेट हल्ले सुरूच ठेवले जातील, असा इशारा त्यांनी दिला. यापूर्वी इस्रायलने इराणचे वरिष्ठ नेते अली लारजानी आणि पॅरामिलिटरी प्रमुख गोलम्रेझा सुलेमानी यांनाही लक्ष्य केले होते. विशेष म्हणजे, २८ फेब्रुवारी रोजी सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्या हत्येनंतर इराणमधील उच्चपदस्थ अधिकारी सतत इस्रायलच्या निशाण्यावर आहेत.
इराण सरकारने दिलेल्या माहितीनुसार, हे युद्ध सुरू झाल्यापासून आतापर्यंत १,३०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून, मृतांमध्ये मोठ्या संख्येने महिला व मुलांचा समावेश आहे. मानवाधिकार संघटनांच्या मते हा आकडा यापेक्षाही मोठा असू शकतो. या सातत्यपूर्ण हल्ल्यांमुळे इराणमध्ये सध्या भीती आणि अनिश्चिततेचे वातावरण आहे.
जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम
इराण आणि इस्रायलमधील या संघर्षामुळे ‘होर्मुझ समुद्रधुनी’ या अत्यंत महत्त्वाच्या व्यापारी जलमार्गावर परिणाम झाला आहे. परिणामी, जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. इराणनेही प्रत्युत्तरादाखल मध्यपूर्वेतील विविध ठिकाणी हल्ले केल्याने युद्धाची व्याप्ती वाढली आहे.
‘भ्याड हत्या’ : राष्ट्राध्यक्ष पेझेश्कियान
राष्ट्राध्यक्ष पेझेश्कियान यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध करताना याला ‘भ्याड हत्या’ असे संबोधले आहे. देशातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निधनामुळे इराण दुःखात असला, तरी आमचा लढा अधिक जोमाने पुढे सुरू राहील, अशा शब्दांत त्यांनी नागरिकांना धीर दिला. दरम्यान, खतीब यांच्या मृत्यूमुळे इराणच्या सुरक्षा यंत्रणेला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.