गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर उमेदवार जाहीर : विरोधकांमध्येही हालचाली सुरू

पणजी : गोव्याच्या राजकारणाचे लक्ष लागून राहिलेल्या फोंडा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष गुरुवारी गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आपल्या उमेदवाराची घोषणा करणार आहे. माजी मंत्री दिवंगत रवी नाईक यांचे पुत्र रितेश नाईक यांना उमेदवारी मिळण्याचे जवळपास निश्चित मानले जात असून, भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी यासंदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे.
भाजप प्रदेशने रितेश नाईक आणि विश्वनाथ दळवी या दोघांची नावे केंद्रीय निवड समितीकडे पाठवली आहेत. बुधवारी रात्री उशिरा भाजप संसदीय मंडळाची बैठक पार पडली असून, त्यामध्ये उमेदवाराच्या नावावर अंतिम चर्चा झाली आहे. जर केंद्रीय नेतृत्वाने चर्चेसाठी पाचारण केले, तर मी आज तातडीने दिल्लीला रवाना होईल. त्यानंतर आजच उमेदवाराचे नाव अधिकृतपणे जाहीर केले जाईल, असे दामू नाईक यांनी स्पष्ट केले.
२०२२ च्या विधानसभा निवडणुकीपर्यंत फोंडा मतदारसंघात भाजपला कधीही यश मिळाले नव्हते. मात्र, रवी नाईक यांनी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर पक्षाने पहिल्यांदाच येथे विजय मिळवला होता. रवी नाईक यांच्या आकस्मिक निधनामुळे ही पोटनिवडणूक होत आहे.
रवी नाईक यांची भक्कम वैयक्तिक मते आणि त्यांच्या निधनानंतरची सहानुभूती यांचा लाभ रितेश नाईक यांना मिळेल, असे भाजपचे गणित आहे. दरम्यान, मित्रपक्ष महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षासह (मगो) भाजपच्या अनेक आमदारांनी रितेश नाईक यांनाच उमेदवारी देण्याची मागणी लावून धरली आहे.
दरम्यान, दिवंगत रवी नाईक यांचा राजकीय वारसा रितेश नाईक यशस्वीपणे पुढे नेणार का, की विरोधक भाजपच्या या बालेकिल्ल्याला सुरुंग लावणार, याकडे आता संपूर्ण गोव्याचे लक्ष लागले आहे.
विरोधकांत दुफळी; बहुरंगी लढतीची चिन्हे
* भाजपचा उमेदवार जाहीर झाल्यानंतर फोंड्याचे राजकीय चित्र स्पष्ट होईल. मात्र, विरोधकांमध्ये एकजूट नसल्याचे दिसून येत आहे.
* काँग्रेसचे उमेदवार केतन भाटीकर यांनी आधीच जनसंपर्क सुरू केला आहे.
* रिव्होल्युशनरी गोवन्स (आरजी) आणि आम आदमी पक्षानेही (आप) स्वतंत्र तयारी सुरू केली आहे.
* माजी मंत्री मिकी पाशेको यांनीही या पोटनिवडणुकीत आपला उमेदवार उतरवण्याची घोषणा केल्याने ही लढत चौरंगी किंवा बहुरंगी होण्याची शक्यता आहे.
निवडणुकीचे वेळापत्रक
* अर्ज भरण्याची शेवटची तारीख : २३ मार्च २०२६
* मतदान : ९ एप्रिल २०२६
प्रचाराचा जोर सुरू : पोटनिवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच संभाव्य उमेदवारांनी प्रचार सुरू केला आहे. भाजपचे संभाव्य उमेदवार रितेश नाईक आणि काँग्रेसचे केतन भाटीकर यांनी घरोघरी जाऊन जनसंपर्क वाढवण्यावर भर दिला आहे. फक्त फोंडा मतदारसंघातच ही निवडणूक होत असल्याने सर्व प्रमुख पक्षांचे नेते येथे तळ ठोकून प्रचार करण्याची शक्यता आहे.