इराणचे सुरक्षा प्रमुख अली लारिजानी हवाई हल्ल्यात ठार

अमेरिका-इस्रायल कारवाईत मृत्यू; इराणच्या राजकारणात मोठी पोकळी

Story: न्यूज डेस्क । गाेवन वार्ता |
18th March, 11:35 pm
इराणचे सुरक्षा प्रमुख अली लारिजानी हवाई हल्ल्यात ठार

तेहरान : इराणमधील प्रभावशाली राजकारणी व राष्ट्रीय सुरक्षा प्रमुख अली लारिजानी यांचा अमेरिका-इस्रायल हवाई हल्ल्यात मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. इस्रायलचे संरक्षणमंत्री इस्राएल कॅट्झ यांनीही त्यांच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. ६७ वर्षीय लारिजानी तेहरानच्या उपनगरात आपल्या मुलीला भेटण्यासाठी गेले असताना हा हल्ला झाल्याचे सांगितले जाते.
लारिजानी हे इराणमधील अत्यंत प्रभावी नेत्यांपैकी एक मानले जात होते. ते सर्वोच्च नेते अली खामनेई यांचे निकटवर्तीय सल्लागार होते. राष्ट्रीय सुरक्षा धोरणांचे शिल्पकार म्हणून त्यांची ओळख होती. १९८० च्या दशकातील इराण-इराक युद्धात त्यांनी रिव्होल्यूशनरी गार्डमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. त्यानंतर राष्ट्रीय प्रसारण प्रमुख, सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे प्रमुख आणि तब्बल १२ वर्षे संसद अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले.
लारिजानी यांची प्रतिमा व्यवहारकुशल व काहीशी मध्यममार्गी अशी होती. आंतरराष्ट्रीय प्रश्न चर्चेतून सोडवण्यावर त्यांचा भर होता. मात्र, जानेवारीतील आंदोलनांवर कठोर कारवाई केल्याचा आरोप त्यांच्यावर झाला होता, ज्यामुळे अमेरिकेने त्यांच्यावर निर्बंध लादले होते.
इराणच्या अणु कार्यक्रमाच्या धोरणात लारिजानी यांचा मोठा वाटा होता. आंतरराष्ट्रीय चौकटीत राहून अणु क्षमता विकसित करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. पश्चिम देशांशी चर्चेदरम्यान ते खामेनेई यांचे विचार प्रभावीपणे मांडत असत. त्यांच्या निधनामुळे इराणच्या राजकीय आणि धोरणात्मक वर्तुळात मोठी पोकळी निर्माण झाल्याचे मानले जात आहे.
इराणचा प्रतिशोधाचा इशारा
लारिजानी यांच्या हत्येनंतर इराणमध्ये संतापाची लाट उसळली आहे. इराणने या हल्ल्याचा बदला घेण्याची अधिकृत घोषणा केली आहे. या भ्याड हल्ल्याला आम्ही चोख प्रत्युत्तर देऊ. आमचे प्रत्युत्तर इतके भीषण असेल की ते कायम लक्षात ठेवले जाईल, असा इशारा इराणचे लष्कर प्रमुख आमिर हातमी यांनी दिला आहे.
मुलीला भेटायला गेले अन् झाला घात!
* इस्रायली गुप्तचर यंत्रणांना तेहरानमधीलच काही गुप्तचरांकडून लारिजानी यांच्या हालचालींची टीप मिळाली होती.
* लारिजानी यांचा सार्वजनिक कार्यक्रमांमधील वाढता सहभाग आणि रॅलींमध्ये उपस्थित राहिल्यामुळे त्यांची ओळख पटवणे आणि त्यांना ट्रॅक करणे इस्रायलसाठी सोपे झाले होते.
* या भीषण हवाई हल्ल्यात केवळ लारिजानीच नव्हे, तर त्यांचा मुलगा, एक जवळचा सहकारी आणि अनेक सुरक्षा रक्षकांचाही जागीच मृत्यू झाला आहे.