गुन्हे शाखेचा अर्ज न्यायालयाने फेटाळला

पणजी : राज्यात गाजलेल्या ‘कॅश फॉर जॉब’ प्रकरणातील मुख्य संशयित पूजा नाईक हिने नार्को चाचणी करण्यास नकार दिला आहे. संशयिताने संमती नाकारल्यामुळे फोंडा येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालयाने गुन्हे शाखेचा नार्को चाचणीचा अर्ज फेटाळून लावला आहे. या निर्णयामुळे आता पूजा नाईकची नार्को चाचणी होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
गेल्या वर्षी हे प्रकरण उघडकीस आले, तेव्हा पूजा नाईक हिने पत्रकार परिषद घेऊन खळबळजनक आरोप केले होते. ‘मी एका मंत्र्याला आणि आयएएस अधिकाऱ्याला नोकऱ्यांसाठी पैसे पोहोचवले आहेत आणि सत्य समोर येण्यासाठी मी नार्को चाचणीला तयार आहे,’ असे जाहीरपणे सांगितले होते. मात्र, प्रत्यक्षात जेव्हा गुन्हे शाखेने तपासासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू केली, तेव्हा तिने न्यायालयात या चाचणीसाठी आपली संमती देण्यास नकार दिला.
या प्रकरणी म्हार्दोळ, फोंडा, डिचोली आणि पर्वरी या ठिकाणी पूजा नाईकविरोधात गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. तपास सुरू असताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गुन्हे शाखेला सखोल चौकशीचे आदेश दिले होते.
तपासावर होणार परिणाम?
नार्को चाचणीला सुरुवातीला तयारी दर्शवलेल्या पूजा नाईक हिने नंतर नकार दिल्याने तपासाच्या प्रक्रियेत अडथळा निर्माण झाला असून, न्यायालयाच्या निर्णयामुळे गुन्हे शाखेला इतर पुराव्यांच्या आधारेच तपास पुढे न्यावा लागणार आहे. या प्रकरणातील ‘बड्या नावांचा’ शोध पोलीस आता कसा लावणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.