हृदयाशीसंबंधित तक्रारींसाठी ५ वर्षांत १०८ सेवेला सर्वाधिक कॉल

रिस्पॉन्स टाइममध्ये घट : रुग्णवाहिका पोहोचण्याचा वेगही वाढला

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
18th March, 11:36 pm
हृदयाशीसंबंधित तक्रारींसाठी ५ वर्षांत १०८ सेवेला सर्वाधिक कॉल

पणजी : राज्यातील १०८ रुग्णवाहिका सेवेने २०२१ ते २०२५ या पाच वर्षांच्या कालावधीत एकूण ३ लाख ४२ हजार ८५५ आपत्कालीन प्रकरणे हाताळून रुग्णांना आधार दिला आहे. ‍‍विशेष म्हणजे, तंत्रज्ञान आणि नियोजनामुळे रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचण्याचा सरासरी वेळ १३ मिनिटे २९ सेकंदांवरून कमी होऊन आता १० मिनिटे २१ सेकंद इतका झाला असून, यामुळे अनेकांचे प्राण वाचवणे शक्य झाले आहे.
१०८ सेवेकडे आलेल्या कॉलचे विश्लेषण केले असता, राज्यात हृदयविकाराशी संबंधित तक्रारींचे प्रमाण चिंताजनक असल्याचे दिसून येते. सर्वाधिक ४८,५९९ प्रकरणे (१४.१७ टक्के) ही हृदयाशी संबंधित होती. यामध्ये तिसवाडी तालुका १३,८६४ प्रकरणांसह आघाडीवर आहे. रस्ते अपघातांव्यतिरिक्त इतर अपघातांची ४५,५६२ (१३.२८ टक्के) प्रकरणे नोंदवली गेली. तर रस्ते अपघातांचे ३७,५३१ (१०.९४ टक्के) कॉल्स आले.
अपघातांच्या बाबतीत सासष्टी तालुक्यातून सर्वाधिक ७,९९८ कॉल आले. पोटदुखी (१२.२६ टक्के) आणि श्वसनाचा त्रास (९.२० टक्के) या कारणांसाठीही मोठ्या प्रमाणात रुग्णवाहिकेची मदत घेण्यात आली. याशिवाय मानसिक आजार (३८६), तीव्र डोकेदुखी (८३३) आणि अॅलर्जी (६२८) अशा प्रकरणांसाठीही १०८ सेवा धावून आली. कुपोषण आणि नैसर्गिक आपत्तीच्या घटनांमध्ये तुलनेने कमी कॉल आले.
तिसवाडी तालुक्यातून सर्वाधिक कॉल
सर्वात जास्त कॉल येणाऱ्या तालुक्यांमध्ये तिसवाडी (७९,६४९) प्रथम क्रमांकावर आहे. त्यानंतर बार्देश (६०,७८६) आणि सासष्टी (५४,४३७) तालुक्यांचा क्रमांक लागतो. हृदयविकाराचे सर्वाधिक रुग्ण तिसवाडीत, तर अपघाताचे सर्वाधिक रुग्ण सासष्टी तालुक्यात आढळले आहेत. सांगे आणि काणकोण तालुक्यातून तुलनेने कमी कॉल नोंदवले गेले.                  

हेही वाचा