पाच वर्षांत पापलेट, इसवण, मोरी, खेकड्यांच्या उत्पादनात घट

बांगडे, तारले, सुंगटा, लेपोचे उत्पादन वाढले

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
18th March, 11:44 pm
पाच वर्षांत पापलेट, इसवण, मोरी, खेकड्यांच्या उत्पादनात घट

पणजी : गेल्या पाच वर्षांच्या कालावधीत गोव्याच्या मत्स्योद्योगाने झेप घेतली असून, एकूण उत्पादनात २०.९२ टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे. मात्र मत्स्य खात्याकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, पापलेट, इसवण, मोरी, खेकडे आदींच्या उत्पादनात घट झाल्याचे दिसून आले आहे.
आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये १ लाख ६ हजार १५९ टन असणारे मासळीचे उत्पादन २०२४-२५ मध्ये १ लाख २८ हजार ३७८ टनांवर पोहोचले आहे. विशेष म्हणजे, मासळीच्या निर्यातीतून मिळणाऱ्या महसुलातही दुपटीने वाढ झाली असून, गोव्याची मासळी आता जागतिक बाजारपेठेत आपले स्थान अधिक बळकट करत आहे. गोव्यात बांगडे, तारले, सुंगटा (कोळंबी), लेपो अशा माशांचे उत्पादन मात्र वाढले आहे.
आर्थिक वर्ष २०२०-२१मध्ये बांगड्याचे उत्पादन २८ हजार ७०३ टन होते. २०२४-२५ मध्ये ते वाढून ४३ हजार ७२८ टन झाले. २०२०-२१ मध्ये तारल्याचे उत्पादन ५२१८ टन होते. २०२४-२५ मध्ये ते २० हजार ७०५ टन झाले. २०२०-२१ मध्ये सुंगटाचे उत्पादन ५४७० टन होते. २०२४-२५ मध्ये ते १० हजार ७२ टन झाले. २०२०-२१ मध्ये लेपोचे उत्पादन १७४१ टन होते. २०२४-२५ मध्ये ते १७६ टनांनी वाढून १९१७ टन झाले. तर पाच वर्षांत माणकीचे उत्पादन ४५३९ टनांनी वाढून ६४०१ टन झाले.
पाच वर्षांच्या कालावधीत काही माशांचे उत्पादन कमी झाले आहे. २०२०-२१ मध्ये इसवणचे उत्पादन ४०३१ टन होते. २०२४-२५ मध्ये ते कमी होऊन ते १५९४ टन झाले. मोरीचे उत्पादन ६६८ टनांनी कमी होऊन २२३ टन झाले. २०२०-२१ मध्ये वेल्लीचे उत्पादन ४२० टन होते. २०२४-२५ मध्ये ते २१५ टन झाले. २०२०-२१ मध्ये खेकड्यांचे उत्पादन २१६८ टन होते. २०२४-२५ मध्ये ते कमी होऊन ते १२०२ टन झाले.
...
मत्स्य उत्पादन निर्यातीत वाढ
मिळालेल्या माहितीनुसार, वरील कालावधीत मासळी आणि यासंबंधीत उत्पादने निर्यात करण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. २०२०-२१ मध्ये गोव्यातून ४३५.२५ कोटी रुपये मूल्याचे १६ हजार ५४९ टन मत्स्य उत्पादने निर्यात झाली होती. २०२४-२५ मध्ये ७८८ कोटी रुपये मूल्य असणारे ४५ हजार ४६९ टन मत्स्य उत्पादने निर्यात झाली. 


हेही वाचा