अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल

मडगाव : मडगाव शहरात बनावट नोटांचे मोठे रॅकेट सक्रिय असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. येथील आयडीबीआय बँकेत ५०० रुपयांच्या तब्बल ९८ बनावट नोटा जमा झाल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी मडगाव पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करून तपासाचा फास आवळला आहे.मिळालेल्या माहितीनुसार ही घटना ८ फेब्रुवारी २०२६ रोजी घडली होती. केरळमधील कासारगोड येथील कन्सूल हक नावाच्या व्यक्तीच्या बचत खात्यात एका अज्ञात व्यक्तीने ही रोकड जमा केली होती. बँकेत जमा करण्यात आलेल्या रकमेची तपासणी केली असता, त्यात ५०० रुपयांच्या ९८ नोटा म्हणजेच एकूण ४९ हजार रुपये बनावट असल्याचे उघडकीस आले. आयडीबीआय मडगाव बँकेचे व्यवस्थापक सुरम मुकेश यांच्या तक्रारीनंतर, मडगाव पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदवला आहे.
दरम्यान, या प्रकरणाचे कनेक्शन मडगावात असल्याचे समजताच बेळगाव पोलिसांच्या पथकाने बुधवारी मडगावात येऊन चौकशी केली. संशयित मडगावचे रहिवासी असल्याने या प्रकरणी सखोल तपास सुरू आहे.
व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण
मडगावात बनावट नोटांच्या व्यवसायाची मुळे घट्ट रुजल्याचा संशय आता बळावला आहे. बनावट नोटा चलनात आणण्यासाठी हे एक मोठे जाळे असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. पोलीस निरीक्षक अरुण गावस देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक स्वदेश देसाई या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. या घटनेमुळे मडगावमधील व्यापारी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
कर्नाटकपर्यंत पोहोचले धागेदोरे
या प्रकरणाची व्याप्ती केवळ गोव्यापुरती मर्यादित नसून त्याचे धागेदोरे कर्नाटकातील बेळगावपर्यंत पोहोचले आहेत. बेळगाव पोलिसांनी नुकतेच बनावट नोटांचे एक रॅकेट उद्ध्वस्त केले असून, त्यात गोव्यातील संशयितांचा समावेश आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये संशयित मोहम्मद अरबाज (२१ रा. तळेबांध दवर्ली), रूपेश हनुमंत वाकोडे (२६, रा. काणकोण), मोहम्मद हुसेन बक्की (२३, रा. मडगाव) आणि श्रवणकुमार (२५, रा. बिहार) या संशयितांना अटक केली आहे.