मिराबागच्या आंदोलकांनी आंदोलनस्थळी उभारली गुढी

बंधाऱ्याविरोधात गेले ३८ दिवस आंदोलन

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
12 mins ago
मिराबागच्या आंदोलकांनी आंदोलनस्थळी उभारली गुढी

सांगे : मिराबाग येथील प्रस्तावित बंधाऱ्याविरोधात सुरू असलेल्या आंदोलनस्थळी गुढीपाढवा साजरा करण्यात आला. स्थानिक रहिवासी गेले ३८ दिवस या ठिकाणी आंदोलन करत आहेत. गुरुवारी आमदार विजय सरदेसाई, सांगेचे नगरसेवक मॅश्यू डिकॉस्ता आणि भाजप नेत्या सुषमा नाईक व इतरांनी आंदोलनस्थळी भेट दिली.
यावेळी आमदार विजय सरदेसाई म्हणाले की, लोकांना काळोखात ठेवून आणलेला हा प्रकल्प रद्द करण्यात यावा. नव्या वर्षात मुख्यमंत्र्यांनी हा बंधारा रद्द केला म्हणून जाहीर करायला हवे होते. लोक एकत्र आले तरच गोव्याला चांगले दिवस येतील. जर हा बंधारा सरकारने रद्द केला नाही तर गावागावांत जाऊन मी आंदोलन उभे करणार आहे.
सांगेचे नगरसेवक मॅश्यू डिकॉस्टा म्हणाले, आंदोलकांनी येथे गुढी उभारली, शिगमोत्सवही इथेच साजरा केला. आता तरी सरकारने लोकांचा विचार करावा.
संकेत भंडारी म्हणाले की, सरकारने लोकांचा संसार रस्त्यावर आणला आहे. पाडव्याच्या निमित्ताने तरी सरकारच्या मनात चांगला विचार येऊन या लोकांच्या भल्यासाठी हा बंधारा कायमचा रद्द करायला हवा.
मिराबाग येथील भाजप महिला अध्यक्ष सुषमा नाईक म्हणाल्या की, आमचा कामधंदा सोडून, मुलाबाळांना घरी सोडून गेले ३८ दिवस आम्ही आंदोलन करत आहोत. सरकारने हा बंधारा रद्द करावा.
देविदास आमोणकर म्हणाले, सरकार घडते ते लोकांचे विषय विधानसभेत मांडण्यासाठी, लोकांच्या मागण्या मांडण्यासाठी. पण तसे होत नाही. महत्त्वाचे निर्णय घेताना लोकांना विश्वासात घेतले पाहिजे.