फोंड्यात रितेश आणि केतन यांच्यात होणार लढत

'आप'कडूनही उमेदवार जाहीर

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
27 mins ago
फोंड्यात रितेश आणि केतन यांच्यात होणार लढत

पणजी : फोंडा पोटनिवडणुकीसाठी भाजपने दिवंगत रवी नाईक यांचे सुपुत्र रितेश नाईक यांची उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे आता या निवडणुकीत रितेश आणि केतन यांच्यात थेट लढत पाहायला मिळणार आहे. दरम्यान, आम आदमी पक्षानेही (आप) आपला उमेदवार रिंगणात उतरवल्याने ही पोटनिवडणूक आता बहुरंगी होणार आहे.

उमेदवारीसाठी प्रदेश भाजपकडून रितेश नाईक आणि विश्वनाथ दळवी या दोन नावांची शिफारस करण्यात आली होती. त्यापैकी अपेक्षेप्रमाणे रितेश यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. काँग्रेसने यापूर्वीच डॉ. केतन भाटीकर यांची उमेदवारी जाहीर केली आहे.

फोंडा मतदारसंघासाठी ९ एप्रिल रोजी मतदान होणार असून, २३ मार्चपर्यंत उमेदवारी अर्ज सादर करण्याची मुदत आहे. आम आदमी पक्षाने या पोटनिवडणुकीची तयारी आधीपासूनच सुरू केली होती. दोन दिवसांपूर्वीच पक्षात प्रवेश केलेल्या गीतेश नाईक यांची उमेदवारी 'आप'ने जाहीर केली आहे. 'आप'ने निवडणुकीत उडी घेतल्याने विरोधी पक्षांची संभाव्य आघाडी संपुष्टात आली आहे. आता 'रिव्होल्युशनरी गोअन्स' (आरजी) उमेदवार उभा करण्याबाबत कोणती भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

'एसआयआर'नंतर (SIR) ४ हजारांहून अधिक मते कमी झाल्याने मतदारसंघातील समीकरणे बदलली आहेत. त्यातच 'आप'ने स्वतंत्र उमेदवार उभा केल्यामुळे भाजपविरोधी मतांचे विभाजन होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.