गोवा : तीन वर्षांत मटका जुगाराविरोधात १,९७५ जणांवर कारवाई

सर्वाधिक २२७ कारवाई गुन्हे शाखेकडून

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
44 mins ago
गोवा : तीन वर्षांत मटका जुगाराविरोधात १,९७५ जणांवर कारवाई

पणजी : गेल्या तीन वर्षांच्या काळात राज्यात मटका जुगाराविरोधात (Gambling/Matka) पोलिसांनी १,९७५ जणांवर कारवाई केली आहे. सर्वाधिक २२७ कारवाई गुन्हे शाखेने केल्या असून सर्वांत कमी १५ कारवाई मांद्रे पोलिसांनी केल्या आहेत, अशी लेखी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली आहे.
विधानसभेच्या पटलावर बाणावलीचे आमदार वेंझी व्हिएगस यांनी विचारलेल्या प्रश्नाला लेखी उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, मटका जुगाराविरुद्ध नियमित छापे आणि दंडात्मक कारवाई सुरू आहे. मटका नियंत्रणात आणण्यासाठी बेकायदेशीर मटक्याबाबत माहिती मिळताच कायद्याच्या तरतुदींनुसार गुन्हे नोंदवले जातात.

२०२४ मध्ये सर्वाधिक प्रकरणे नोंद

वर्ष २०२३ ते २०२५ या दरम्यान १,९७५ प्रकरणे मटक्याविरोधात नोंदवण्यात आली आहेत. सर्वाधिक ७५२ प्रकरणे २०२४ मध्ये नोंदवली गेली, तर २०२३ मध्ये ६२९ आणि २०२५ मध्ये ५९४ प्रकरणे नोंद झाली आहेत.

२२७ प्रकरणांसह गुन्हे शाखा पहिल्या स्थानावर

सर्वाधिक २२७ प्रकरणांसह गुन्हे शाखा पहिल्या स्थानावर आहे. दुसऱ्या स्थानावर १६३ प्रकरणांसह पणजी पोलीस स्टेशन आणि १२१ प्रकरणांसह मडगाव पोलीस स्टेशन चौथ्या स्थानावर आहे. २०२३ ते २०२४ या काळात सर्वाधिक टक्केवारीने वाढ म्हार्दोळ पोलीस स्टेशनमध्ये झाली असून, २०२३ मध्ये केवळ ५ प्रकरणांवरून २०२५ मध्ये हा आकडा २७ पर्यंत पोहोचला, जी ४२० टक्के वाढ आहे. पणजी पोलीस स्टेशनमध्ये केसेसची संख्या जास्त असूनही तिथे दरवर्षी थोडी-थोडी वाढ होत राहिली. २०२३ मध्ये ५३, २०२४ मध्ये ५४ आणि २०२५ मध्ये ५६ प्रकरणे नोंदवली गेली.

फोंडा पोलीस स्टेशनमध्ये २०२३ ते २०२५ या काळात प्रकरणांची संख्या जवळपास दुप्पट झाली. २०२३ मध्ये १८ प्रकरणे होती, तर २०२५ मध्ये हा आकडा ३५ वर पोहोचला.
२०२४ ते २०२५ या काळात अनेक पोलीस स्टेशनांमध्ये केसेसची संख्या घटली. विशेषतः म्हापसा पोलीस स्टेशनमध्ये ३२ प्रकरणांवरून ही संख्या १२ वर आली, म्हणजेच ६२.५ टक्क्यांनी घट झाली.


हेही वाचा