
पणजी : कर्नाटक (Karnataka) आणि तामिळनाडू (Tamil Nadu) दरम्यान तयार झालेले टर्फ तसेच अन्य वातावरणातील बदलामुळे राज्यात १८ आणि १९ मार्च रोजी पाऊस (Rain) पडण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. या दोन दिवसांत विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाची शक्यता आहे. यानुसार खात्याने या दोन दिवसांसाठी पावसाचा ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. तर २० ते २३ मार्च दरम्यान राज्यातील वातावरण कोरडे राहण्याची शक्यता आहे.
मंगळवारी पणजीत (Panjim) कमाल ३३ अंश तर किमान २४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मुरगाव मधील कमाल तापमान ३२.८ अंश व किमान तापमान २३ अंश सेल्सिअस राहीले. पुढील सहा दिवस राज्यातील कमाल तापमान ३३ ते ३४ अंश तर किमान तापमान २४ ते २५ अंश सेल्सिअस पर्यंत राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. मागील काही दिवसांत राज्यातील काही भागात ढगाळ वातावरण होते. मात्र पावसाची नोंद झालेली नाही.
याआधी खात्याने मार्च, एप्रिल आणि मे या तीन महिन्यांच्या कालावधीत गोव्यातील कमाल आणि किमान तापमान सरासरी पेक्षा अधिक राहण्याची शक्यता व्यक्त केली आहे. असे असले तरी गोव्यात उष्णतेच्या लाटेची शक्यता नसल्याचे खात्याने स्पष्ट केले होते. वरील कालावधीत राज्यात सरासरी एवढा किंवा त्याहून किंचित कमी पाऊस पडण्याची शक्यता खात्याने व्यक्त केली होती. गतवर्षी मार्च महिन्यात उकाडा वाढला होता. खात्याने १ ते १० मार्च २०२५ दरम्यान उष्णतेचा ‘यलो अलर्ट’ जारी केला होता.