बनावट आयएएस अधिकाऱ्याच्या कारनाम्याने बिहारमध्ये खळबळ

पटना : युपीएससी (UPSC) परीक्षा उत्तीर्ण होऊन आयएएस (IAS) अधिकारी बनल्याची बतावणी करून राजकीय नेते (Political leader), पोलीस अधिकारी (Police officer), ग्रामस्थ मित्रमंडळी यांच्याकडून सत्कार, पार्ट्या ही स्वीकारल्या. मोठ्या तोऱ्यात वावरू लागला. मात्र, काही युवकांच्या सतर्कतेमुळे बनावट आयएएस अधिकाऱ्याचे एकूण भिंग फुटले. आणि पोलिसांच्या चौकशीचा ससेमीरा चुकवण्यासाठी पळून फिरण्याची वेळ आली. नंतर पोलिसांनी त्याला अटक करून कारवाई सुरू केली.
बिहार (Bihar) येथील शेखपुरा जिल्ह्यातील या घटनेची सध्या सर्वत्र चर्चा आहे. रणजीत कुमार यादव यांच्या या कारनाम्यामुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे. फतेहपुर गावातील कामगार म्हणून काम करीत असलेल्या रणजीत कुमार यादव याने आपण २०२५ साली युपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन आयएएस अधिकारी बनल्याची बतावणी केली.
सोशल मीडियावरून ही माहिती सर्वत्र पसरली आणि ग्रामस्थ, मित्रपरिवाराचा आनंद ओसंडून वाहू लागला. एवढे मोठे यश साजरे करण्यासाठी सत्कार सोहळे, पार्ट्याही सुरू झाल्या. कित्येकांनी पदरमोड करून पार्ट्याही दिल्या.
माहिती मिळताच आरजेडी पक्षाचे शेखपुराचे माजी आमदार विजय सम्राट यांनी रणजीत याच्या घरी येऊन गळा भेट घेऊन सत्कार केला. रोख रक्कम व ब्रिफकेस भेट दिली. पोलीस अधिकाऱ्यांना याची माहिती मिळताच माहुलीचे एसएचओ रामप्रवेश भारती यांनी पोलीस स्थानकावर बोलावून सत्कार केला व लाडूही वाटले.
मात्र गावातील काही युवकांनी निकालाची पडताळणी करण्याचा निर्णय घेतला. युपीएससीच्या यादीत त्यांनी पाहिले असता; युपीएससीत अखिल भारतीय पातळीवर ४४० वा रॅंक मिळवणारा रणजीत कुमार आर. हा चिक्कबल्लापुर, कर्नाटक येथील होता. शेखपुराचा रणजीत कुमार यादव नव्हता.
एकूण युवकांच्या सतर्कतेमुळे रणजीत कुमार यादव याचे भिंग फुटले. त्यांनी कर्नाटकातील युवकाचा निकाल आपला म्हणून दाखवल्याचेही उघड झाले. हे सर्व घडताच माहुलीचे एसएचओ रामप्रवेश भारती यांनी त्याला निकाल व कागदपत्रे आणून दाखवण्यास सांगितले.
पोलिसांनी माहिती मागवताच आपले भिंग फुटल्याचे कळून चुकताच रणजीत कुमार यादव घरातून पळून गेला. त्याच्या कुटुंबीयांशी चौकशी केली असता तो दिल्लीला गेल्याचे व फोन उचलत नसल्याचे सांगितले. नंतर पोलिसांनी त्याला शोधून काढून अटक केली. सध्या, हा नकली आयएएस अधिकारी पोलिसांचा पाहुणचार घेत आहे.