पाकिस्तान-अफगाणिस्तान युद्ध : काबूलमध्ये रुग्णालयावर हल्ला; ४०० ठार

पाकिस्तानचा हल्ल्याचा इन्कार

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
53 mins ago
पाकिस्तान-अफगाणिस्तान युद्ध : काबूलमध्ये रुग्णालयावर हल्ला; ४०० ठार

काबूल : अफगाणिस्तानची (Afganisthan)  राजधानी काबूल (Kabul) येथे ड्रग पुनर्वसन रुग्णालयावर (Hospital)  हवाई हल्ला (Air strike)  झाल्याचा गंभीर आरोप अफगाणिस्तानकडून करण्यात आला आहे. या घटनेत सुमारे ४०० जणांचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला आहे. २५० जण जखमी झाले आहेत. मात्र, पाकिस्तानने (Pakistan) हल्ल्याचा इन्कार केला आहे. हे आरोप फेटाळत हा दावा “खोटा आणि दिशाभूल करणारा” असल्याचे पाकिस्तानने म्हटले आहे.

अफगाणिस्तानच्या आरोग्य मंत्रालयाचे प्रवक्ते शरीफत जमन यांनी सांगितले की, या हल्ल्यात रुग्णालय पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. सोमवारी रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास काबूलमध्ये जोरदार स्फोटांचे आवाज ऐकू आले. रमजानच्या रोजा सोडल्यानंतर बाहेर पडलेल्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आणि अनेकांनी जीव वाचवण्यासाठी आसरा घेतला.

तालिबान सरकारचे (Taliban Government) प्रवक्ते जबीहुल्लाह मुजाहिद यांनी पाकिस्तानच्या सैन्यावर हवाई हल्ल्याचा आरोप करत हा “मानवतेविरुद्ध गुन्हा” असल्याचे म्हटले. पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या हवाई हद्दीचे उल्लंघन करून रुग्णालयाला लक्ष्य केल्याचा दावा त्यांनी सोशल मीडियावर केला.

पाकिस्तानकडून हल्ल्याचा इन्कार

दरम्यान, पाकिस्तानच्या माहिती मंत्रालयाने हे सर्व आरोप नाकारले आहेत. पाकिस्तानने स्पष्ट केले की, त्यांच्या लष्कराने केवळ दहशतवादी तळ आणि संबंधित संरचनांवर अचूक कारवाई केली असून नागरिक किंवा रुग्णालयावर हल्ला झाल्याचा दावा चुकीचा आहे.

या घटनेच्या काही तासांपूर्वीच पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमारेषेवर दोन्ही देशांमध्ये गोळीबार झाला होता. त्यात  अफगाणिस्तानात किमान चार जणांचा मृत्यू झाला. गेल्या काही आठवड्यांपासून दोन्ही देशांतील तणाव वाढत असून ही घटना त्या संघर्षातील मोठी वाढ मानली जात आहे.

दोन्ही देशांनी संयम बाळगावा : चीन 

दरम्यान, चीनने या वाढत्या तणावाबाबत चिंता व्यक्त करत दोन्ही देशांनी संयम बाळगावा आणि चर्चेच्या माध्यमातून तोडगा काढावा, असे आवाहन केले आहे.

हेही वाचा