होर्मुझ सामुद्रधुनीवरून तणाव वाढला; ट्रम्पची नाटोला धमकी

इराणचा नेतान्याहूंना ठार मारण्याचा इशारा

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
19 mins ago
होर्मुझ सामुद्रधुनीवरून तणाव वाढला; ट्रम्पची नाटोला धमकी

वॉशिंग्टन : मध्यपूर्वेत अमेरिका-इस्रायल-इराण (USA-Israel-Iran)  यांच्यातील युद्धामुळे तणाव अधिकच वाढला असून; परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर बनत आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी होर्मुझ सामुद्रधुनीच्या सुरक्षेसाठी सहयोगी देशांनी मदत केली नाही तर “खूप वाईट भविष्य” भोगावे लागेल, असा इशारा नाटो देशांना दिला आहे.

 इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सने (Islamic Revolutionary Guard Corps)  इस्रायलचे पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू ( Benjamin Netanyahu) यांना ठार मारण्याची उघड धमकी दिली आहे. त्यांना “निरपराध मुलांचा खूनी” असे संबोधत, ते जिवंत असतील तोपर्यंत त्यांच्यावर हल्ले सुरूच ठेवणार असल्याचे गार्ड्सने स्पष्ट केले.

मध्यपूर्वेत वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची ( Abbas Araghchi) यांनी इशारा दिला की, जर इराणच्या ऊर्जा पायाभूत सुविधांवर हल्ले झाले तर मध्यपूर्वेतील अमेरिकेच्या कंपन्यांवर प्रत्युत्तरात्मक कारवाया केल्या जातील.

दरम्यान, इराकमधील बगदाद येथील अमेरिकेच्या दूतावासावर क्षेपणास्त्र हल्ला झाल्यानंतर अमेरिकेने आपल्या नागरिकांना तत्काळ देश सोडण्याचे आवाहन केले आहे. या हल्ल्यात दूतावास परिसरातील हेलिपॅडचे नुकसान झाले असल्याची माहिती मिळाली.

होर्मुझ सामुद्रधुनीतून नियमित २ कोटी बॅरल तेल वाहतूक 

होर्मुझ सामुद्रधुनी (Strait of Hormuz)  ही जागतिक तेल व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. दररोज सुमारे २ कोटी बॅरल तेलाची या मार्गाने वाहतूक होते. जे जगातील एकूण तेल वापराच्या जवळपास पाचव्या भागा इतके आहे. त्यामुळे या मार्गावर तणाव वाढल्याने जागतिक ऊर्जा बाजारावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

युद्धातील महत्त्वाच्या घडामोडी

अमेरिका-इस्रायलच्या हल्ल्यांमध्ये इराणमधील इस्फहान प्रांतातील अनेक ठिकाणांवर क्षेपणास्त्र हल्ले; किमान १५ जणांचा मृत्यू.

इराणकडून इस्रायलवर क्षेपणास्त्रांची मालिका; इराक व कुवेतमधील अमेरिकन तळांवरही हल्ल्याचा दावा.

लेबनॉनमधील इस्रायली हल्ल्यांमध्ये मृतांची संख्या ८२६ वर; सुमारे ८.३१ लाख नागरिक विस्थापित.

खार्ग बेटावरील तेल निर्यात केंद्रावर अमेरिकेची कारवाई; अनेक स्फोट झाल्याचा इराणचा दावा.

बगदादमधील अमेरिकेच्या दूतावासावर क्षेपणास्त्र हल्ला; त्यासाठी इराणसमर्थक मिलिशियाला जबाबदार धरले.

दरम्यान, अमेरिकेने मध्यपूर्वेत आपली लष्करी उपस्थिती वाढवली असून अतिरिक्त २,५०० मरीन सैनिक आणि युएसएस ट्रीपोली (USS Tripoli)  युद्धनौका या भागाकडे रवाना करण्यात आली आहे. त्यामुळे या संघर्षाचा विस्तार होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा