
कटक: ओडिशातील कटक येथील प्रतिष्ठित 'एससीबी मेडिकल कॉलेज आणि रुग्णालया'त सोमवारी पहाटे भीषण आग लागल्याची घटना घडली. रुग्णालयाच्या ट्रॉमा केअर आयसीयू विभागाला लागलेल्या या आगीत १० गंभीर रुग्णांचा होरपळून व गुदमरून मृत्यू झाला आहे. पहाटेच्या सुमारास जेव्हा रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक गाढ झोपेत होते, तेव्हा ही घटना घडली. प्राथमिक तपासानुसार, आयसीयूमध्ये झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी पहाटे २:३० ते ३:०० च्या दरम्यान ट्रॉमा केअर युनिटच्या पहिल्या मजल्यावरील अतिदक्षता विभागात (आयसीयू) अचानक आग लागली. या विभागात गंभीर आजारांनी ग्रस्त रुग्ण उपचार घेत होते. आगीने रौद्र रूप धारण करताच रुग्णालयात एकच खळबळ उडाली आणि धुराचे लोट सर्वत्र पसरले. आगीची भीषणता एवढी होती की, रुग्णांना बाहेर काढणे कठीण झाले होते. अग्निशमन दलाच्या गाड्यांनी घटनास्थळी धाव घेत शर्थीचे प्रयत्न केले. रुग्णांना सुरक्षित ठिकाणी हलवत असताना रुग्णालयातील ११ कर्मचारीही आगीत होरपळून जखमी झाले आहेत. कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता रुग्णांना वाचवण्यासाठी धाव घेतली, ज्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
घटनेची माहिती मिळताच ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण मांझी आणि आरोग्य मंत्री मुकेश महालिंग यांनी तातडीने रुग्णालयात धाव घेतली. मुख्यमंत्र्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि रुग्णालय प्रशासनासोबत बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री मांझी यांनी सांगितले की, आयसीयूमध्ये एकूण २३ रुग्ण उपचार घेत होते. आगीनंतर तातडीने स्थलांतर प्रक्रिया सुरू करण्यात आली, मात्र दुर्दैवाने सात गंभीर रुग्णांचा दुसऱ्या वॉर्डमध्ये हलवत असतानाच मृत्यू झाला, तर अन्य तिघांनी उपचारादरम्यान प्राण गमावले. जखमी कर्मचाऱ्यांवर योग्य उपचार करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत.
या भीषण दुर्घटनेत प्राण गमावलेल्या रुग्णांच्या वारसांना मुख्यमंत्री मोहन चरण मांझी यांनी प्रत्येकी २५ लाख रुपयांची सानुग्रह मदत जाहीर केली आहे. तसेच, या प्रकरणाची सखोल न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सरकारी रुग्णालयातील अग्निशमन सुरक्षा यंत्रणा आणि तांत्रिक देखभालीबाबत या निमित्ताने मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. सध्या रुग्णालयाचा बाधित भाग सील करण्यात आला असून, पुढील तांत्रिक तपासणी सुरू आहे.