विशेष बैठकीत सूचना : शिरगावच्या श्री लईराई जत्रोत्सवासाठी कडक तयारी

शिरगाव येथे आयोजित धोंडगणांच्या बैठकीत मार्गदर्शन करताना दीनानाथ गावकर. सोबत सूर्यकांत गावकर, पोलीस निरीक्षक विजय राणे, मामलेदार शैलेंद्र देसाई, उपनिरीक्षक श्रीधर कामत व इतर.
डिचोली : शिरगाव येथील श्रीदेवी लईराई जत्रोत्सवाची तयारी सध्या जोरात सुरू असून, गेल्यावर्षी घडलेल्या दुर्दैवी घटनेतून धडा घेत देवस्थान समिती आणि प्रशासनाने यावर्षी जत्रोत्सव सुरक्षित व शिस्तबद्ध पार पडावा यासाठी व्यापक नियोजन केले आहे. याच पार्श्वभूमीवर शिरगाव येथील श्रीदेवी लईराई मंदिराच्या सभामंडपात जत्रोत्सवात सहभागी होणाऱ्या धोंडगणांची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी धाेंड गणांसह सर्वांनी नियमांचे आणि शिस्तीचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले.
या बैठकीस देवस्थान समितीचे अध्यक्ष दीनानाथ गावकर, मामलेदार शैलेंद्र देसाई, पोलीस निरीक्षक विजय राणे, उपनिरीक्षक श्रीधर कामत, चौगुले मानकरी सूर्यकांत गावकर, अजय गावकर यांच्यासह देवस्थान समितीचे पदाधिकारी व मोठ्या संख्येने धोंडगण उपस्थित होते.
बैठकीत जत्रोत्सवातील धार्मिक विधींचा क्रम, सुरक्षा व्यवस्था व करण्यात आलेले बदल याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. होमकुंड पेटवल्यानंतर धोंडगणांना तळीकडे जाण्यासाठी एकच मार्ग वापरण्यात येईल. होमकुंड मार्गक्रमणाच्या वेळी हा मार्ग भाविकांसाठी बंद राहील. मंदिर परिसर व होमकुंड परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असून, सर्व हालचालींची नोंद ठेवली जाणार आहे.
स्थानिकांनी शिरगाव परिसरातील मद्यालये रात्री उशिरापर्यंत सुरू राहत असल्याची तक्रार मांडली. यावर उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांकडून जत्रोत्सवाच्या दिवशी परिसरातील मद्यालये बंद ठेवण्याचा आदेश काढण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक विजय राणे यांनी दिली.
चौगुले मानकरी सूर्यकांत गावकर यांनी धोंडगणांना संबोधित करताना सांगितले की, गुढीपाडव्यापासून सर्व धोंडगण जत्रोत्सवाच्या व्रतादाखल शाकाहार पाळतात आणि जत्रेच्या तीन ते पाच दिवस आधी सोवळे व्रत पाळले जाते. देवीची सेवा करताना प्रत्येकाने शिस्त व जबाबदारी राखणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.
अजय गावकर यांनी गेल्यावर्षी झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेचा उल्लेख करत सहा मृत धोंडगणांना श्रद्धांजली वाहिली. अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी सर्वांनीच जबाबदारीने वागण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. दरम्यान, या बैठकीत अनेक धोंडगणांनी देवस्थान समिती व प्रशासनास विविध सूचना देखील मांडल्या.
होमकुंड मार्गक्रमणासाठी कडक सुरक्षा
देवस्थान समितीचे अध्यक्ष दीनानाथ गावकर यांनी सांगितले की, दरवर्षीप्रमाणे सर्व धार्मिक विधी पार पडतील. मात्र, यावर्षी मंदिरातून चिरा व कळस बाहेर काढताना तसेच होमकुंड मार्गक्रमणाच्या वेळी विशेष सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. या सर्व नियमांचे धोंडगण व भाविकांनी पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले. अग्निदिव्य पार केल्यानंतर धोंडगणांसाठी पाणी किंवा शीतपेयांची व्यवस्था करण्यासाठी होमकुंडाच्या वरच्या भागात मर्यादित दुकाने उभारण्यास जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी मिळाल्यासच मंजुरी दिली जाईल, असे ते म्हणाले.
जत्रोत्सवासाठी कडक पोलीस बंदोबस्त
पोलीस निरीक्षक विजय राणे यांनी सांगितले की, जत्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. गर्दी नियंत्रणासाठी मंदिर परिसरात धोंडगणांसाठी स्वतंत्र मार्ग तर भाविकांसाठी स्वतंत्र रांगांची व्यवस्था केली जाईल.