जनतेचे ऐका, अन्यथा चालते व्हा!

श्रीस्थळ येथील बैठकीत न्या. फेर्दिन रिबेलो यांचा इशारा

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
37 mins ago
जनतेचे ऐका, अन्यथा चालते व्हा!

‘इनफ इज इनफ’च्या वडामळ येथे झालेल्या सभेत बोलताना निवृत्त न्यायाधीश फेर्दिन रिबेलो. सोबत कमलाकर म्हाळशी, संदेश प्रभुदेसाई व इतर. (संजय कोमरपंत)

काणकोण : लोकशाहीत जनता सर्वश्रेष्ठ असून जनतेचे ऐकायला हवे, जे जनतेचे ऐकणार नाहीत त्यांनी चालते व्हावे, असा इशारा निवृत्त न्यायमूती फेर्दिन रिबेलो यानी दिला.
श्रीस्थळ-वडामळ येथील श्रीस्थळ पंचायतीजवळीळ खुल्या सभागृहात झालेला ‘इनफ इज इनफ’ च्या जाहीर सभेत बोलताना त्यांनी हा इशारा दिला. या सभेच्या अध्यक्षस्थानी साहित्यिक कमलाकर म्हाळशी होते. तर व्यासपीठावर ज्येष्ठ पत्रकार संदेश प्रभुदेसाई, आदिवासी समाज अभ्यासक देविदास गावकर, पर्यावरण संरक्षक डेनिस फर्नांडिस, कल्पना भट उपस्थित होते.
यावेळी साहित्यिक म्हाळशी यांनी सांगितले की, आता पर्यावरण रक्षणकरिता खरी चळवळ सुरू झाली आहे. आता शिकल्यानंतर आम्ही स्वयंपूर्ण झाले की काय याची कसोटी लागणार आहे. ज्या आदिवासीनी जमिनीचे रक्षण केले. ज्या जमिनी वसविल्या त्या जमिनीपासूनच आदिवासी समाज आज दूर असून त्यांना जमिनीचा कोणताच हक्क मिळालेला नाही. ज्या वनाचे रक्षण वनखात्याने करायला हवे त्याच्याकडूनच वनाची नासाडी होत असल्याचा आरोप गावकर यांनी केला.
ज्येष्ठ पत्रकार संदेश प्रभुदेसाई यांनी यावेळी सरकारच्या धोरणांवर सडकून टीका केली. ते म्हणाले की, "सुरुवातीला मी आयआयटी प्रकल्पाचे समर्थन केले होते. मात्र, आता चांगल्या प्रकल्पांच्या नावाखाली सरकार जनतेला मूर्खात काढत असल्याचे स्पष्ट होत आहे. माहिती अधिकार कायद्यातून समोर आलेली फिल्मसिटीची सत्यता पाहता, सरकारवर विश्वास तरी कसा ठेवायचा?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
यावेळी कल्पना भट, डेनिस फर्नांडिस यानी पर्यावरण रक्षणासंबंधी पैंगिण, लोलये पोळे येथील प्रकल्पासंबंधी उपस्थितांना माहिती दिली व ‘इनफ इज इनफ’ आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला.
नद्या, डोंगर, संस्कृतीच्या रक्षणाची वेळ
नद्या आणि डोंगर नष्ट करण्याचा अधिकार सरकारला नाही. नागरिक हे निसर्गाचे खरे मालक असून, सरकार केवळ त्याचे विश्वस्त आहे. आमची लोकशाही, आमची संस्कृती नष्ट करायला कुणाला दिली जाणार नाही. ‘नागरिकांचे हक्क काय’ यासंबंधी नागरिकांच्या हक्कांची माहिती देणारी पुस्तिका लवकरच काढली जाईल आणि ‘इनफ इज इनफ’च्या बैठका गावोगावी घेऊन जनतेत जागृती केली जाईल. पुढील पिढीसाठी गोवा सुरक्षित ठेवायचा असेल, तर आताच गोवेकरांनी जागे होण्याची वेळ आली आहे, अशी आर्त हाक रिबेलो यांनी काणकोणवासीयांना मारली.