बाळ्ळी गावचा शिडीयोत्सव

केपे तालुक्यातील बाळ्ळी-कुंकळ्ळी गावात साजरा होणारा शिडीयोत्सव हा असाच एक पारंपरिक पद्धतीने चालत आलेला उत्सव साऱ्या गोमंतकामध्ये प्रसिद्ध आहे. चणेकर, कुपकर, अर्धवाडेकर, थळकार, व्हडलोवाडेकर अशा पाच कुटुंबातील देसाई कुटुंबाचा या उत्सवात सहभाग असतो.

Story: जत्रा |
50 mins ago
बाळ्ळी गावचा  शिडीयोत्सव

प्राचीन काळापासून गोमंत भूमी लोकसंस्कृतीसाठी समृद्ध भूमी म्हणून ओळखली जाते. आपल्या संत महंतांनी व ऋषिमुनींनी रामायण, महाभारत, उपनिषदे, काव्य-पुराणे यांची निर्मिती करून भारतीय संस्कृती समृद्ध करण्याचे महान कार्य केले. लोकगीतांची रचना करून लोककला विकसित केल्या. सण, उत्सवांची परंपरा सुरू करून मानवी मन हर्षमय करण्याचा प्रयत्न केला. सदोदित धकाधकीचे जीवन जगणाऱ्या कष्टकरी समाजाच्या आयुष्यात थोडा तरी विरंगुळा लाभावा, कामधंदा, नोकरी - व्यवसायाच्या निमित्ताने विभक्त झालेली कुटुंबे एकत्र यावी, मौज-मजा करावी, आपली सुखदुःखे विसरून नव्या जोमाने काम करण्याची इच्छा उत्पन्न व्हावी यासाठी गणेशोत्सव, धालोत्सव, शिमगोत्सव यासारखे धार्मिक कार्यक्रम सुरू केले. अहंकार, मतभेद, द्वेष, मत्सर यांना तिलांजली देऊन सण उत्सवांच्या निमित्ताने सर्वांनी एकत्र येऊन संघटन शक्ती वाढावी, आनंद उपभोगता यावा हेच यामागचे उद्दिष्ट असल्याचे दिसून येते. आपल्या रूढी-परंपरांचे जतन करून त्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवता यावे या उद्देशाने आज आपण निरनिराळे उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरे करतो.

केपे तालुक्यातील बाळ्ळी - कुंकळ्ळी गावात साजरा  होणारा शिडीयोत्सव हा असाच एक पारंपरिक पद्धतीने चालत आलेला उत्सव साऱ्या गोमंतकामध्ये प्रसिद्ध आहे. 

श्री देवी शांतादुर्गा बाळ्ळीकरणीचा हा उत्सव सतत  पाच दिवस चालतो. षष्टी, सप्तमी, अष्टमी या दिवसात रथातून देवीची मिरवणूक, दिवजोत्सव, नाटक असे  कार्यक्रम असतात. नवमीच्या दिवशी शिडीयोत्सव साजरा केला जातो. सकाळी आठ ते नऊच्या दरम्यान श्री शांतादुर्गा बाळ्ळीकरीण मंदिरासमोर उंचावर उभारलेल्या व फुलांनी सुशोभित केलेल्या लाटेला 'देवाचा गडा' लटकवून त्याला रहाटाच्या सहाय्याने गरगर फिरवले जाते. चणेकर, कुपकर, अर्धवाडेकर, थळकार, व्हडलोवाडेकर अशा पाच कुटुंबातील देसाई कुटुंबाचा या उत्सवात सहभाग असतो.

गड्यांना तीन दिवस उपवास असतो. हा धार्मिक विधी परंपरागत चालत आलेला असून जर हा विधी पूर्ण केला नाही, तर देसाई कुटुंबातील अविवाहितांना विवाह करता येत नाही. त्यासाठी लहानपणीच हा विधी केला जातो. तीन, पाच, सात, नऊ अशा विषम वर्षातील मुलांना गडे बनवून देवाला अर्पण केले जाते. अष्टमी, नवमी, दशमी हे तीन दिवस गडे घराबाहेर राहतात. त्या दिवसात त्यांना घरात येता येत नाही. नवमीच्या दिवशी सकाळी आंघोळ करुन त्यांना सोवळे (धोतर) नेसवतात. डोक्यावर अबोली फुलांपासून बनवलेला टोप घालतात. याला 'तुरा' असे म्हणतात. या लहान गाड्यांबरोबर दोन मोठे गडे असतात. त्यांना 'देवाचे गडे' असे म्हणतात. पारंपरिक वेष परिधान केल्यानंतर हे गडे तिथे जवळच असलेल्या तळीवर जातात. या तळीला 'माधव तळी' असे म्हटले जाते. माधव तळीतील पाण्यात हात पाय धुऊन देवाला नमस्कार करुन मागे न बघता सर्व गडे घरवईकडे (कुलपुरुष) जाण्यास निघतात. देसाई कुटुंबाचे ५ घरवई असल्याचे सांगण्यात येते. गड्यांना घेऊन ते आपापल्या घरवईकडे जातात. तेथे प्रत्येक गडा देवाला विडा ठेवून नमस्कार करतो. नंतर गड्यांच्या पोटाला सुई दोऱ्याने दोन टाके घालतात व दोरा पोटावर लोंबकळत ठेवतात. प्रत्येक गडा चौथऱ्यावर नारळ वाढवून मंदिराकडे जाण्यास निघतो. घरवईकडे गेलेल्या गड्यांचे विधीवत कार्य आटोपल्यावर वाटेत सर्व गडे एकत्र येतात. परंपरागत रितीरिवाजानुसार त्यांना वाजत गाजत  मंदिराजवळ असलेल्या शिडीयोत्सव मंचाकडे आणले जाते. फुलांनी सुशोभित केलेल्या मंचावर सर्व गडे विराजमान होतात. यावेळी उन्हाची पर्वा न करता सर्व भाविक मंदिराजवळ गर्दी करतात. मेवा, मिठाई, खेळणी, चहा-पाण्याची दुकाने यामुळे मंदिर परिसराला जत्रेचे स्वरूप येते. शिडीयोत्सवाची सर्व तयारी पूर्णत्वास आलेली असते. एक भलामोठा वृक्ष रहाटाला जोडलेला असतो. त्याच्या सर्व फांद्या तोडून साफ केलेले लाकूड फुलांनी सजवून लाटेप्रमाणे केले जाते. लाकडाच्या मागच्या बाजूला एक शिडी जोडलेली असते. पुढच्या भागाच्या मध्यवर्ती ठिकाणी कपड्याच्या सहाय्याने देवाच्या गड्याला लोंबकळले जाते. यावेळी त्यांचे तोंड जमिनीच्या दिशेने असते. एका हातात चवर आणि दुसऱ्या हातात घंटा असते. घंटा वाजवत हातातील चवरीने तो देवाला वारा घालत असतो. लाट जवळ-जवळ आठ ते दहा मीटर उंचावर जोडलेले असतात. मागच्या बाजूस बसवलेल्या शिडीवर पाच पन्नास माणसे उभी राहतात. त्याबरोबर लाट वर येते आणि शिडीयोत्सवाला सुरुवात होते. रहाटावर गड्याला फिरवले जाते. पाच फेरे मारले जातात. नंतर गडे गावातील सर्व मंदिरात जाऊन देवांची भेट घेतात व श्री शांतादुर्गा बाळ्ळीकरीण मंदिराजवळ येतात. तेथे असलेल्या तुळशीवृंदावनाकडे नारळ वाढवून पोटाचा धागा काढण्यात येतो.

त्यानंतर अशाच प्रकारे शिडीयोत्सव कुंदेश्वर मंदिराकडे साजरा केला जातो. या लाटेला देवाचा दुसरा गडा लोंबकळला जातो. श्री शांतादुर्गा बाळ्ळीकरीण मंदिरासमोर शिडीयोत्सवासाठी वापरण्यात आलेले लाकूड दुसऱ्या वर्षी कुंदेश्वर देवाच्या शिडीयोत्सवासाठी वापरण्याची प्रथा आहे. शिडीयोत्सवासाठी 'माट्टी' या वनस्पतीचा वापर करण्यात येतो. उत्सवाच्या पहिल्या दिवशी सुळकर्णे येथील कावरे रानातून हा भलामोठा वृक्ष आणून गावच्या राखणदाराकडे ठेवतात व तेथेच साफ करतात. नंतर देव राखणदाराला गाऱ्हाणे घातले जाते व ते लाकूड आणून शिडी जोडली जाते. शिडीयोत्सवाच्या दिवशी संध्याकाळी कोंबड्याचा बळी दिला जातो. त्यामुळे नवमी जर सोमवारी आली, तर शिडीयोत्सव त्या दिवशी न करता एक दिवस पुढे अथवा मागे करण्यात येतो. गड्यांना संध्याकाळी मांसाहारी जेवण असते. दशमीच्या दिवशी गुलालोत्सव साजरा केला जातो. गुलाल उधळल्यानंतर गड्यांना घरी जाण्यास मोकळीक असते. निसर्गाचा वरदहस्त लाभलेला केपे तालुक्याचा काही भाग जंगलाने व्यापलेला आहे. विशेष म्हणजे धार्मिक कार्यासाठी अशा वनस्पतीची गरज असल्यामुळे ही जंगले येथील लोकांनी राखून ठेवलेली आहेत. तात्पर्य, येथे साजरे करण्यात येणारे उत्सव हे नैसर्गिक संपत्तीचे रक्षणकर्ते असे म्हणणेच उचित ठरेल.