लिव्ह-इन पार्टनरवर क्रूर हल्ला; कॅसिनो व्यवस्थापकाचा जामीन न्यायालयाने फेटाळला

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
15th March, 11:41 pm
लिव्ह-इन पार्टनरवर क्रूर हल्ला; कॅसिनो व्यवस्थापकाचा जामीन न्यायालयाने फेटाळला

पणजी : पीडित महिलेवर संशयिताने इतक्या क्रूरपणे हल्ला केला होता की त्यानंतर तिला रुग्णालयात नेले, याला काहीच महत्त्व उरत नाही. कारण तिला रुग्णालयात नेण्याची वेळ येण्यास तोच कारणीभूत होता. अन्यथा, या घटनेचे रूपांतर कदाचित खुनाच्या गुन्ह्यात झाले असते, असे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने एका कॅसिनोच्या व्यवस्थापकाचा जामीन अर्ज फेटाळून लावला.

याबाबतचा आदेश मेरशी येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या न्या. आरतीकुमारी नाईक यांनी दिला.

महिलेने बिगर सरकारी संस्थेच्या सदस्याची मदत घेऊन महिला पोलीस स्थानकात याबाबत तक्रार दाखल केली. त्यानुसार, संशयित आणि तक्रारदार महिलेचे संबंध असल्यामुळे ते दोघे एकत्र राहत होते. २५ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजून ३६ मिनिटांनी संशयिताने महिलेच्या डोक्यावर ठोसे मारले. तसेच हाताला पकडून डोके जमिनीवर वारंवार आपटले. त्यात ती गंभीर जखमी झाली. याशिवाय संशयिताने ‘तुला मारून टाकीन’ अशी धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले. या प्रकरणी पणजी महिला पोलिसांनी दखल घेऊन संशयिताच्या विरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी संशयिताला अटक केली.

संशयिताने मेरशी येथील सत्र न्यायालयात जामीन दाखल केला. या प्रकरणी न्यायालयात सुनावणी झाली.

या प्रकरणी सरकारी अभियोक्ता कोलमॅन राॅड्रिग्ज यांनी बाजू मांडली. त्या दोघांमध्ये लिव्ह इन रिलेशन असले आणि त्यानेच तिला इस्पितळात दाखल केले तरी जामीन देता येत नाही. तक्रारीत महिलेने संशयिताने तिचे डोके हातात पकडून जमिनीवर आपटून मारहाण केल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच वैद्यकीय अहवालात तिला गंभीर जखमा झाल्याचे नमूद आहे. त्यामुळे जामीन फेटाळण्याची मागणी केली.

या प्रकरणी न्यायालयाने दोन्ही बाजू एेकून घेतल्यानंतर वरील निरीक्षण नोंदवून एका कॅसिनोच्या व्यवस्थापकाचा जामीन फेटाळून लावला.

महिलेने स्वत: जखाम करुन घेतल्याचा युक्तिवाद

सुनावणीदरम्यान संशयिताच्या वकिलांनी असा युक्तिवाद केला की, संशयित आणि पीडित महिला लिव्ह-इन रिलेशनमध्ये राहत होते. वारंवार होणाऱ्या वादांमुळे त्यांनी काही काळापूर्वी वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता. घटनेच्या वेळी महिलेने स्वतःलाच जखमा करून घेतल्या आणि त्यानंतर संशयितानेच तिला रुग्णालयात दाखल केले.