दोघांना अटक : मालपे येथे कारवाई

पेडणे : मालपे पेडणे येथे राष्ट्रीय महामार्ग ६६ परिसरात अमली पदार्थ विरोधी कारवाई करत पेडणे पोलिसांनी १ किलो ६३७ किलो गांजासह दोघांना अटक केली. जप्त केलेल्या गांजाची बाजारातील किंमत सुमारे १ लाख ६४ हजार रुपये आहे. अटक करण्यात आलेले दोघेही चंदगड- कोल्हापूर येथील आहेत.
पेडणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १३ मार्च रोजी सायंकाळी ७.५५ ते रात्री ११ दरम्यान मालपे पेडणे येथील नीलिमा रेस्टॉरंट जवळील राष्ट्रीय महामार्ग ६६ रस्त्याच्या परिसरात अमली पदार्थ विरोधी छापा टाकण्यात आला. या कारवाईदरम्यान संशयिताच्या ताब्यातून गांजा आढळून आला. हा गांजा त्यांनी एम. एच. ०९ जिओ ९१३४ क्रमांकाच्या मारुती एर्टिगा कारमध्ये लपवून ठेवला होता.
याप्रकरणी पोलिसांनी विनोद कुमार (३०, चंदगड) आणि अतिक मलिक (२३, चंदगड) या दोघांना अटक केली. विनोद कुमार हा व्यवसायाने चालक असून मलिक हा फॅब्रिकेटर असल्याचे समोर आले. छाप्यात १.६३७ किलो गांजा तसेच मारुती एर्टिगा कार असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी १४ मार्च रोजी पहाटे दोन वाजता पेडणे पोलीस ठाण्यात अमली पदार्थ कायद्याचे कलम २० व दोन बी अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला. प्राथमिक चौकशी केली असता अटक करण्यात आलेले दोघेआंतरराज्य अमली पदार्थ व्यवसायात गुंतले असल्याचा संशय पेडणे पोलिसांनी व्यक्त केला. पेडणे पोलीस उपनिरीक्षक प्रथमेश पार्सेकर व इतरांनी ही कारवाई केली. या प्रकरणी पोलीस निरीक्षक नितीन हळर्णकर, पोलीस उपअधीक्षक सलीम शेख यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उत्तर गोव्याचे पोलीस अधीक्षक हरिश्चंद्र मडकईकर यांच्या देखरेखीखाली तपास सुरू आहे.