कळंगुट येथील वाहतूक बेट पाडल्याचे प्रकरण

पणजी : कळंगुट येथील ‘टिटो सर्कल’वर उभारण्यात आलेले वाहतूक बेट २०१६ मध्ये पाडण्यात आले होते. सदर वाहतूक बेट सरकारी खर्चानेच उभारण्यात आले होते, या दाव्याला पुष्टी देणारा कोणताही पुरावा सादर करण्यास अपयश आले. शिवाय, या प्रकरणातील प्रमुख साक्षीदार तथा आमदार मायकल लोबो यांनी न्यायालयात मौन बाळगले, असे निरीक्षण नोंदवून न्यायालयाने तत्कालीन सरपंच अॅनी कुएलो आणि उपसरपंच जोजफ सिक्वेरा या दोघांची पुराव्याअभावी निर्दोष सुटका केली. याबाबतचा आदेश म्हापसा येथील प्रथमवर्ग न्यायालयाच्या न्या. अक्षता काळे यांनी दिला.
‘टिटो सर्कल’वर उभारण्यात आलेले वाहतूक बेट ४ ऑक्टोबर २०१६ रोजी सायंकाळी ३.१० वा. जेसीबीद्वारे पाडण्याचे काम सुरू होते. या घटनेची माहिती स्थानिक आमदार मायकल लोबो यांना मिळाली. त्यानुसार, त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच या प्रकरणी बार्देशचे तत्कालीन मामलेदार दशरथ गावस आणि सार्वजनिक बांधकाम खात्याच्या रस्ता विभागाचे कार्यकारी अभियंता ब्रह्मानंद नाईक यांना घटनेची माहिती देऊन पाचारण केले. तसेच घटनेसंदर्भात पत्रव्यवहार केला. घटनेची दखल घेत नाईक यांनी कळंगुट पोलीस स्थानकात तत्कालीन सरपंच अॅनी कुएलो आणि उपसरपंच जोजफ सिक्वेरा यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. त्यात वरील दोघांनी परवानगीशिवाय वाहतूक बेट जमीनदोस्त केल्याचे म्हटले. याची दखल घेऊन पोलिसांनी तत्कालीन सरपंच अॅनी कुएलो आणि उपसरपंच जोजफ सिक्वेरा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून कारवाई केली. त्यानंतर पोलिसांनी तपास पूर्ण करून ४ नोव्हेंबर २०१८ रोजी म्हापसा प्रथमवर्ग न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. या प्रकरणी प्रथमदर्शनी पुराव्याची दखल घेऊन न्यायालयाने वरील संशयितांविरोधात १७ ऑक्टोबर २०२२ रोजी आरोप निश्चित करून खटला सुरू केला.
न्यायालयाने प्रमुख साक्षीदार तथा आमदार मायकल लोबो यांची न्यायालयात उलटतपासणी झाली असता, त्यांनी या प्रकरणी काही बोलण्यास नकार देत मौन बाळगले. याप्रकरणी न्यायालयाने वरील निरीक्षण नोंदवून तत्कालीन सरपंच अॅनी कुएलो आणि उपसरपंच जोजफ सिक्वेरा या दोघांची पुराव्याअभावी निर्दोष सुटका केली.
बेट सरकारी खर्चाने न बांधल्याचे उघड
दोन्ही सरकारी अधिकाऱ्यांना बेट कोणी बांधले, तसेच सरकारी खर्चाने बांधले का, याबाबत माहिती मागितली असता, त्यांच्याकडे कोणतीही माहिती उपलब्ध नव्हती. तसेच सदर बेट सरकारी खर्चाने बांधल्याचे पुरावे देण्यास ते अपयशी ठरले. बेट बिगर सरकारी संस्थेने बांधल्याचे समोर आले.