नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

हरमल : देऊळवाडा येथील श्री रवळनाथ मंदिर ते मिठागर रस्त्यावर शनिवार, १४ मार्च रोजी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास पट्टेरी वाघाचे दर्शन झाल्याची घटना समोर आली. अचानक वाघ समोर आल्याने दुचाकीवरून जाणाऱ्या प्रत्यक्षदर्शी नागरिकाची क्षणभर बोबडी वळली. सुदैवाने वाघ काही क्षण रस्त्यावर थांबल्यानंतर जंगलाच्या दिशेने निघून गेल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
शनिवारी पहाटेच्या सुमारास एका दुचाकी चालकाला हा थरारक अनुभव आला. रस्त्यावर अचानक पट्टेरी वाघ दिसल्याने तो काही काळ घाबरून थांबला. मात्र वाघाने कोणताही हल्ला न करता काही वेळ रस्त्यावर थांबल्यानंतर जंगलाच्या दिशेने कूच केली.
देऊळवाडा परिसरात पाण्याचे स्रोत असल्याने जंगलातील वाघ पाण्याच्या शोधात खाली उतरला असावा, अशी शक्यता स्थानिकांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, या भागात गवे देखील येऊ लागल्याने बागायतदार आणि शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण वाढले आहे. गेल्या आठवड्यात गव्याने शेतकरी पार्सेकर यांच्या जर्सी गायीला धडक देऊन ठार केल्याची घटना घडली होती. या घटनांमुळे बागायतदारांनी धसका घेतला असून वन विभागाने तातडीने परिस्थितीची दखल घेऊन आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.
गेल्या वर्षी या भागात बिबट्याने दोन कुत्रे तसेच काही वासरांवर हल्ला करून त्यांचा फडशा पाडला होता. त्यानंतर नानोसकरवाडा येथे तुये वन विभागाने पिंजरा लावून त्या बिबट्याला जेरबंद केले होते. काही काळ या परिसरात वन्य प्राण्यांचा वावर कमी झाला होता. मात्र आता पुन्हा वाघाचे दर्शन झाल्याने नागरिकांची झोप उडाली आहे, असे स्थानिक नागरिक कृष्णा नाईक यांनी सांगितले.