अंतिम युक्तीवाद पूर्ण : बनावट आरोग्य दाखला प्रकरण

म्हापसा : कांदोळी प्राथमिक आरोग्य केंद्राचा बनावट दाखला तयार करून फसवणूक केल्याच्या प्रकरणात संशयित आरोपी बर्च क्लबचे मालक गौरव लुथरा व सौरभ लुथरा यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील अंतिम युक्तीवाद पूर्ण झाला. म्हापसा अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय २० मार्च रोजी या अर्जावर निवाडा देणार आहे. तर, बर्च अग्नितांडव प्रकरणी दुसऱ्यांदा दाखल केलेल्या लुथरा बंधूंच्या जामीन अर्जावरील सुनावणी न्यायालयाने २० रोजी पर्यंत तहकूब केली.
शुक्रवार, १३ रोजी झालेल्या सुनावणीवेळी गौरव लुथराच्यावतीने ज्येष्ठ वकील अॅड. सुबोध कंटक, अॅड. व्ही. सुरी, अॅड. नेहा खोलकर व अॅड. साईचा देसाई या तर सौरभ लुथराच्यावतीने अॅड. पराग राव व अॅड. आर. वझरकर हे न्यायालयात उपस्थित होते. तसेच सरकारी वकील जेनिफर सांतामारिया उपस्थित होत्या. सुनावणीवेळी न्यायालयाने दोन्ही बाजूंचा अंतिम युक्तीवाद ऐकून घेतला.
ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) हे मूल्यवान प्रतिभूती नाही. असा दावा करत संशयित अर्जदारांच्या वकिलांनी अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर करण्याची विनंती न्यायालयाकडे केली. तर, सरकारी पक्षाने जामिनाला विरोध करत अर्जदार पक्षाचा दावा खोडून काढला. एनओसी ही मूल्यवान प्रतिभूतीच आहे. कारण याचा वापर उत्पादन शुल्क परवाना मिळवण्यासाठी करण्यात आला होता. यातील अर्जदार आरोपी हेच त्याचे लाभार्थी होते. या तपासासाठी आरोपींची पोलीस कोठडी आवश्यक आहे. कारण म्हापसा पोलिसांना या प्रकरणाचा तपास करण्यासाठी अद्याप आरोपींची कोठडी मिळालेली नाही.
दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्यावर, न्यायालयाने या अर्जावर आदेश देण्यासाठी २० मार्च रोजी सुनावणी निश्चित केली. याशिवाय न्यायालयाने पुढील सुनावणीच्या तारखेपर्यंत अंतरिम संरक्षण कायम ठेवणारा आदेश जारी केला आहे.
सुनावणीनंतर पत्रकारांशी बोलताना अॅड. पराश राव यांनी सांगितले की, एनओसी ही मूल्यवान प्रतिभूती नाही. तसेच भारतीय न्याय संहितेच्या कलम ४६७ अंतर्गत येणारा गुन्हाच केवळ अजामीनपात्र आहे. तर इतर कलमे जामीनपात्र आहेत. त्यामुळे एनओसी ही मूल्यवान प्रतिभूती ठरू शकत नाही. आम्ही प्रतिवादी पक्षाच्या आरोपपत्राचा संदर्भ घेऊन हे देखील सिद्ध केले आहे की, एलएलपी कंपनीमधील कोणत्याही भागीदाराच्या ताब्यात ती एनओसी कधीच आली नव्हती. त्यामुळे तिची बनावटगिरी करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. कोणत्या भागीदाराने ती बनावट एनओसी तयार केली होती, हे सिद्ध झालेले नाही.
दरम्यान, कांदोळी आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. रोशन नाझारेथ यांनी १७ डिसेंबर रोजी दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे म्हापसा पोलिसांनी हा बनावटगिरी व फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता.
दरम्यान, संशयित लुथरा बंधूंनी बर्च दुर्घटनेशी निगडीत गुन्ह्यात जामीन मिळावा म्हणून दुसऱ्यांदा जामीन अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर शुक्रवारी अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी झाली. त्यानंतर हणजूण पोलिसांना आपले म्हणणे सादर करण्यासाठी १८ मार्जपर्यंत वेळ देऊन अर्जदार पक्षाच्या युक्तीवादासाठी ही सुनावणी २० मार्चपर्यत तहकूब करण्यात आली.
अजय गुप्ताच्या जामीन अर्जावर सुनावणी
संशयित आरोपी अजय गुप्ता याच्या जामीन अर्जावर देखील शुक्रवार, १३ रोजी म्हापसा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी झाली. ही सुनावणी १७ मार्चपर्यंत तहकूब करण्यात आली आहे.