मनोहर पर्रीकर स्कॉलर योजनेचा आता लाभ घेता येणार ५० विद्यार्थ्यांना

यापूर्वी होती ३० विद्यार्थी मर्यादा : निधीच्या रकमेत मात्र घट

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
12th March, 11:40 pm
मनोहर पर्रीकर स्कॉलर योजनेचा आता लाभ घेता येणार ५० विद्यार्थ्यांना

पणजी : उच्च शिक्षण संचालनालयाकडून मनोहर पर्रीकर गोवा स्कॉलर योजनेत बदल करण्यात आला आहे. यानुसार लाभार्थी विद्यार्थ्यांची कमाल संख्या ३० वरून ५० करण्यात आली. तर विद्यार्थ्यांना दिला जाणारा निधी कमी करण्यात आला आहे. याआधी पदव्यूत्तर तसेच पीचडीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ८ लाख रुपये तर विदेशातील शिक्षणासाठी २५ हजार यूएस डॉलरची मदत देण्यात येत होती. आता ती अनुक्रमे ६ लाख रुपये आणि १५ लाख रुपये करण्यात आली आहे.

नवीन योजनेचा आढावा तीन वर्षांनी घेण्यात येणार आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्याचे वय १८ ते ३५ वर्षांदरम्यान असणे आवश्यक आहे. अर्जदार १५ वर्षे गोव्याचा रहिवासी असणे गरजेचे आहे. ७ वर्षे रहिवासी असणाऱ्या मूळ गोमंतकीय विद्यार्थ्यांना देखील याचा लाभ घेता येईल. यासाठी विहित नमुन्यातील अर्ज खात्याकडे सादर करावा लागेल. सोबत सीव्ही आणि आपल्याला या योजनेसाठी पात्र का ठरवावे याबाबत ५०० शब्दांत माहिती देणे आवश्यक आहे. आलेल्या अर्जांची छाननी करण्यात येईल.

योजनेसाठी चार सदस्यीय छाननी समितीची स्थापना करण्यात आली आहे. उमेदवारांची छाननी दहावी, बारावी, पदवीचे गुण आणि अन्य निकषांवर केली जाणार आहे. समिती आलेल्या अर्जापैकी १०० उमेदवारांची शिफारस करेल. यानंतर ७ सदस्यीय समिती पात्र विद्यार्थ्यांची निवड करणार आहे. शालेय महाविद्यालयातील परीक्षेतील गुण, मुलाखत, शिक्षण संस्था अशा विविध निकषांवर अंतिम निवड केली जाणार आहे. या योजनेसाठी सरकारने उच्च शिक्षण फंडाची स्थापना केली आहे. योजनेचा निधी या फंडातून देण्यात येणार आहे. 

हेही वाचा