बागातील एक रेस्टॉरन्टही सील

म्हापसा : कळंगुट प्रोमिनाद या समुद्रकिनारी मार्गावरील सात टॅटू दुकाने आणि खोब्रावाडा येथील एक रेस्टॉरन्टला पंचायतीने सील ठोकले. वैध परवान्याविना व्यवसाय करणे आणि बेकायदा कृत्य सुरू असल्याच्या कारणास्तव ही आस्थापने सील करण्यात आली.
ही कारवाई शुक्रवारी सकाळी सरपंच जोजफ सिक्वेरा व सचिव अर्जुन वेळीप यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली. याविषयी सरपंच जोजफ सिक्वेरा यांनी सांगितले की, प्रोमिनादवरील सात टॅटू दुकानांमधील कर्मचारी पर्यटकांचा छळ करत होते. खाेटी आश्वासने आणि बेकायदेशीर कृत्यांची प्रलोभने दाखवून मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक करत असल्याचे आढळून आले होते. शिवाय ही दुकाने पंचायतीच्या वैध परवान्याशिवाय चालवली जात होती. त्यामुळे ती सील करण्यात आली आहेत. तसेच खोब्रावाडा, बागा येथील एक रेस्टॉरन्ट सील करण्यात आले. त्या जागेचा वापर बेकायदेशीर कृत्यांसाठी केला जात होता.
३ मद्यविक्री दुकाने बंद करण्याचा ठराव
ही मोहीम यापुढेही सुरूच राहील. प्रोमिनाद ठिकाणी असलेली तीन घाऊक मद्यविक्री दुकाने बंद करण्याचा ठरावही पंचायतीने घेतला आहे. समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांच्या मद्यपान करण्याला आळा घालता यावा, यासाठी हा ठराव घेतला. या दुकानांचे उत्पादन शुल्क परवाना रद्द करण्याबाबत आम्ही अबकारी खात्याला पत्र लिहिणार आहोत, अशी माहिती सिक्वेरा यांनी दिली.