मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत : ‘गोवा सरस २०२६’ प्रदर्शनाचा समारोप

पणजी : येत्या डिसेंबरपर्यंत राज्यातील बचत गटांची वार्षिक उलाढाल ५०० कोटी रुपयांपर्यंत वाढवण्यासोबतच, १ लाख महिलांना या गटांखाली आणण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. कांपाल येथील बांदोडकर मैदानावर आयोजित ‘गोवा सरस २०२६’ प्रदर्शनाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते.महिला आणि बचत गटांना प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी ‘सरस’ प्रदर्शनाचे आयोजन केले जाते. यावेळच्या प्रदर्शनाबाबत बाेलताना मुख्यमंत्री म्हणाले, यंदाच्या प्रदर्शनात एकूण ४८० स्टॉल्स होते, ज्यापैकी ९० टक्के स्टॉल्स हे महिला बचत गटांचे होते. खरेदीसाठी देखील महिलांची मोठी गर्दी होत होती. देशाचा अर्थसंकल्प देखील एका महिलेनेच सादर केला असून, गोव्याचा अर्थसंकल्पही पूर्णपणे महिला सक्षमीकरणावर केंद्रित आहे. महिला, युवक आणि शेतकऱ्यांच्या सहभागातूनच ‘विकसित भारत २०४७’ आणि ‘विकसित गोवा २०३७’ चे स्वप्न साकार होणार, असेही त्यांनी सांगितले.
बचत गटांच्या माध्यमातून महिलांना रोजगार देण्यासोबतच नवनवीन उपक्रम सुरू केले जात आहेत. एलपीजी सिलेंडरचा तुटवडा लक्षात घेता, हरवळे येथे बचत गटाने सौर ऊर्जेवर चालणारे पहिले किचन सुरू केले आहे, जिथे १०० लोकांचे जेवण तयार होऊ शकते. तसेच कळंगुट येथे महिलांनी पर्यटकांसाठी ‘बगी सेवा’ सुरू करून रोजगाराची नवी वाट शोधली आहे.
बाजारपेठ उपलब्ध करून देण्यावर भर
बचत गटांनी तयार केलेल्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ आणि व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. कांपाल मैदानावर सलग ११ दिवस चाललेल्या या प्रदर्शनाला गोमंतकीयांनी आणि पर्यटकांनी मोठा प्रतिसाद दिला असून, खरेदीसाठी महिलांची विशेष गर्दी दिसून आली.