गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे सर्वसामान्य त्रस्त, तर बाबूशनी राखला पणजीचा गड

पणजी : विधानसभा अधिवेशनात ‘युनिटी मॉल’ प्रकल्पावरून सरकार आणि विरोधी पक्षांतील आमदारांमध्ये शाब्दिक चकमक पहायला मिळाली. व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या तुटवड्यामुळे अनेक छोटे हॉटेल्स आणि खाद्यपदार्थांच्या दुकानांवर परिणाम झाला. पणजी महापालिकेच्या निवडणुकीत भाजप समर्थित मंत्री बाबूश मॉन्सेरात यांच्या पॅनलने ३० पैकी २७ जागांवर विजय मिळवला. याशिवाय फसवणूक, अपघाताच्या घटना घडल्या. या आठवड्यातील घडामोडींचा घेतलेला आढावा.
रविवार
सांकवाळ ग्रामसभेत मेगा हाऊसिंग प्रकल्पांना विरोध
सांकवाळ पंचायत क्षेत्रातील जमिनीची वहन क्षमता किती आहे, याचा अधिकृत अहवाल प्राप्त झाल्याशिवाय नवीन मेगा हाऊसिंग प्रकल्पांना बांधकामाची परवानगी देण्यात येऊ नये. तसेच भविष्यात ३९(अ) अंतर्गत येणाऱ्या कोणत्याही प्रकल्पांना पंचायतीने मान्यता देऊ नये, अशी जोरदार मागणी सामाजिक कार्यकर्ते नारायण दत्ता नाईक यांनी रविवारी झालेल्या सांकवाळ ग्रामसभेत केली.
मुलीच्या खूनप्रकरणी आईला सशर्त जामीन
२०१९ मध्ये बेतालभाटी येथे आईने आपल्या दोन वर्षीय मुलीचा खून केला होता. याप्रकरणी तिच्या मानसिक आरोग्याची स्थिती लक्षात घेता तिला तुरुंगात ठेवणे उपयोगी ठरणार नाही, असे निरीक्षण नोंदवून गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयाने संशयित राॅड्रिग्ज हिला २५ हजार रुपये व इतर अटींवर सशर्त जामीन मंजूर केला.
कुंकळ्ळीत रेल्वेच्या धडकेने एकाचा मृत्यू
कुंकळ्ळी परिसरात रेल्वेच्या धडकेने एका व्यक्तीचा मृत्यू झाला. त्याचा मृतदेह रेल्वे ट्रॅकनजीकच्या कालव्यात आढळला. कोकण रेल्वे पोलिसांनी केलेल्या चौकशीनंतर मृतदेह महेश अंकोलेश्वर (३५, रा. कारवार) याचा असल्याचे स्पष्ट झाले.
सोमवार
विजयनी माफी न मागितल्यास कारवाईचा इशारा
विधानसभा अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी प्रेक्षक गॅलरीतून निषेधफलक दाखविल्याच्या प्रकाराची गंभीर दखल घेत सभापती गणेश गावकर यांनी आमदार विजय सरदेसाई यांना २४ तासांत सभागृहाची बिनशर्त माफी मागण्याचा आदेश दिला आहे. माफी न मागितल्यास नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
हणजूण-कायसूव ग्रामसभेत फेटाळले ‘३९-अ’चे प्रस्ताव
हणजूण- कायसूव पंचायत क्षेत्रातील नगर नियोजन कायद्याच्या कलम ३९-अ च्या तरतुदींनुसार केलेले झोन बदलाचे वर्तमान प्रस्ताव फेटाळणे, गावातील पाणथळ जागा, कुरणे, वन जमीन, शेत जमीन आणि सीआरझेड क्षेत्रांसारख्या पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील भागांमध्ये झोन बदलाला परवानगी देऊ नये, असा ठराव ग्रामसभेत मंजूर करण्यात आला.
स्वयंअपघातात नावेलीतील तरुणाचा मृत्यू
नावेली-तळावली येथील टाइन कुतिन्हो (३५) याचा दुचाकीच्या स्वयंअपघातात गंभीर जखमी झाल्यानंतर उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी मडगाव पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली आहे.
मंगळवार
विजय सरदेसाईंनी मागितली सभागृहाची माफी
विधानसभा अधिवेशनात ६ मार्च रोजी प्रेक्षक गॅलरीतून फलक फकडवण्याचा प्रकार घडला होता. या प्रकरणी आमदार विजय सरदेसाई यांनी मंगळवारी सभागृहाची बिनशर्त माफी मागितली. आपला सभागृहाचा अपमान करण्याचा हेतू नव्हता. निषेध फलक दाखवणाऱ्या लोकांना पास आपल्या कार्यालयाने दिले असले तरी त्यांचा हेतू माहिती नव्हता. सभागृहाच्या नियमांनुसार पास देणाऱ्या व्यक्तीला अशा गोष्टींसाठी जबाबदार धरता येते का, याबाबत चर्चा करण्याची मागणी त्यांनी केली.
युनिटी मॉलच्या मुद्द्यावरून सत्ताधारी-विरोधकांत खडाजंगी
विधानसभा अधिवेशनात ‘युनिटी मॉल’ प्रकल्पावरून सरकार आणि विरोधी पक्षांतील आमदारांमध्ये शाब्दिक चकमक पहायला मिळाली. चिंबल येथील नियोजित युनिटी मॉल रद्द करण्याच्या अधिकृत घोषणेवरून आणि या प्रकल्पावर आतापर्यंत झालेल्या खर्चाच्या तपशिलावरून विरोधकांनी सरकारला धारेवर घेरले. या मुद्द्यावरून सभागृहात बराच वेळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

होंडा येथील पेपर मिलमुळे प्रदूषण
होंडा औद्योगिक वसाहतीमध्ये कार्यरत असलेल्या सुक्राफ्ट रिसायकलिंग (पेपर मिल) या प्रकल्पामधून सातत्याने होत असलेल्या प्रदूषणामुळे स्थानिक नागरिकांची डोकेदुखी प्रचंड प्रमाणात वाढली आहे. या प्रकल्पातून दुर्गंधीयुक्त काळे पाणी रस्त्यावर पसरल्यामुळे परिसरात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले होते. कंपनीने तत्काळ याची दखल घेऊन रस्त्यावर पसरलेले पाणी दूर करण्यासाठी प्रयत्न केले.
बुधवार
पणजी महापालिकेसाठी ६९.०७ टक्के मतदान
महापालिकेच्या ३० प्रभागांसाठी मतदान शांततेत पार पडले. यंदा निवडणुकीत ६९.०७ टक्के मतदान झाले. २०२१ मध्ये ७०.१९ टक्के मतदान झाले होते. ही निवडणूक प्रामुख्याने भाजप समर्थित मंत्री बाबूश मॉन्सेरात यांचे ‘टुगेदर फॉर प्रोग्रेसिव्ह पणजी’ व उत्पल पर्रीकर यांचे ‘आमी पणजेकार’ पॅनलमध्ये झाली.

व्यावसायिक एलपीजी सिलिंडरचा तुटवडा
दक्षिण गोव्यातील व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या तुटवड्यामुळे अनेक छोटे हॉटेल्स आणि खाद्यपदार्थांच्या दुकानांवर परिणाम झाला आहे. व्यावसायिक सिलिंडर देण्यावर निर्बंध आणण्यात आले आहेत. घरगुती सिलिंडर घेण्यासाठीही एजन्सीबाहेर लोकांच्या रांगा दिसत होत्या.
कोलवाळ कारागृहात दोघा कैद्यांकडून ड्रग्ज तस्करीचा प्रयत्न
बांबोळी येथील गोवा वैद्यकीय इस्पितळातून वैद्यकीय तपासणी करून कोलवाळ कारागृहात परतणाऱ्या दोघा कैद्यांकडे ३४४ ग्रॅम गांजा सापडला आहे. हा ड्रग्ज संशयित कैद्यांनी आपल्या चप्पलमध्ये लपवला होता. याप्रकरणी कोलवाळ पोलिसांनी अंडरट्राईल कैदी दिलीप साहा व मोहम्मद सलमान या दोघांविरुद्ध ड्रग्ज प्रतिबंधक तसेच तुरूंग कायद्यान्वये गुन्हा नोंद केला आहे. कैदी साहा याच्या चप्पलमध्ये १५ हजार रुपये किमतीचा १४३ ग्रॅम तर कैदी मोहम्मद याच्या चप्पलमध्ये २० हजारांचा २०१ ग्रॅम गांजा सापडला.
गुरुवार
हणजूणमध्ये बनाना जलसफरीवेळी महिलेचा मृत्यू
हणजूण येथील समुद्रकिनारी बनाना फ्लोटर राईड जलसफरीवेळी पाण्यात कोसळलेल्या रजनी सुनील इंदोलिया (३६, रा. मध्यप्रदेश) या महिलेचा मृत्यू झाला. रजनी आपल्या कुटुंबियांसमवेत गोव्यात पर्यटनासाठी आली होती. हे सर्व कुटुंबीय हणजूण समुद्रकिनारी बनाना फ्लोटर राईट या जलसफरीचा आनंद घेत असताना ही घटना घडली.

सासमोळे-बायणा येथे कारची तीन वाहनांना धडक
सासमोळे बायणा येथे गुरुवारी पहाटे चारच्या दरम्यान झालेल्या अपघातात एका कारने तीन वाहनांना धडक दिली. कार रस्त्यावर उलटल्याने कारचालक जखमी झाला. अपघातात तीन वाहनांचे व अपघातग्रस्त कारचे नुकसान झाले.
युवकाने गमावले १.६१ लाख रुपये
शिरोडा येथील एका युवकाने ‘यूके’मधून (युनायटेड किंगडम) रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असलेले पार्सल पाठवल्याचा वॉट्सअॅप संदेशाला बळी पडून १ लाख ६१ हजार रुपये गमावले. या प्रकरणी फोंडा पोलिसांनी अज्ञाताच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे.
शुक्रवार

पणजी महापालिकेवर पुन्हा बाबूश पॅनल विजयी
पणजी महापालिकेच्या निवडणुकीत भाजप समर्थित मंत्री बाबूश मॉन्सेरात यांच्या पॅनलने ३० पैकी २७ जागांवर विजय मिळवला. सलग पाच वेळा महापालिका निवडणूक जिंकून बाबूश यांनी पणजीवरील आपले वर्चस्व पुन्हा सिद्ध केले. उत्पल पर्रीकर यांच्या नेतृत्वाखालील ‘आमी पणजेकार’ पॅनलला ३ जागांवर समाधान मानावे लागले.
कळंगुट पंचायतीकडून सात टॅटू दुकाने सील
कळंगुट प्रोमिनाद या समुद्रकिनारी मार्गावरील सात टॅटू दुकाने आणि खोब्रावाडा येथील एक रेस्टॉरन्टला पंचायतीने सील ठोकले. वैध परवान्याविना व्यवसाय करणे आणि बेकायदा कृत्य सुरू असल्याच्या कारणास्तव ही आस्थापने सील करण्यात आली.
सांगे येथील खूनप्रकरणी दोघांची निर्दोष मुक्तता
सांगे येथील शांताराम शानू शिरोडकर यांच्या खून प्रकरणातील संशयित रविदास ऊर्फ रवी शिरोडकर (७० वर्षे) आणि जय शिरोडकर (३९ वर्षे) यांची दक्षिण गोवा अतिरिक्त सत्र न्यायालयाने पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.
शनिवार
कलम ३९ (अ) अंतर्गत ५.४३ लाख चौ.मी. जमीन सेटलमेंट म्हणून अधिसूचित
नगरनियोजन खात्याच्या वादग्रस्त कलम ३९ (अ) अंतर्गत ५.४३ लाख चौ. मी. जमिनीचा झोन बदल निश्चित झाला आहे. खात्याकडे ३९ (अ) अंतर्गत ६४.५ लाख चौ. मी. जमिनीचे सेटलमेंट झोन मध्ये बदल करण्यासाठी अर्ज आले आहेत. त्यातील ५,४३,८०७ चौ. मी. एवढ्या जमिनीचा झोन बदल निश्चित होऊन सेटलमेंट म्हणून अधिसूचित झाली, असे नगर नियोजन मंत्री विश्वजीत राणे यांनी सांगितले.
मालपे येथे १.६४ लाखांचा गांजा जप्त
मालपे-पेडणे येथे राष्ट्रीय महामार्ग ६६ परिसरात पेडणे पोलिसांनी केलेल्या अमली पदार्थविरोधी कारवाईत १.६३७ किलो गांजासह दोघांना अटक केली. जप्त केलेल्या गांजाची बाजारातील किंमत सुमारे १.६४ लाख रुपये आहे. अटक करण्यात आलेले दोघेही चंदगड कोल्हापूर आहेत.
लक्षवेधी
कोठंबी-पाळी, डिचोली येथील महिलेचा प्रसूतीनंतर ४१ वर्षीय महिलेचा २०२३ मध्ये मृत्यू झाला होता. या प्रकरणी म्हापसा पोलिसांनी खासगी हॉस्पिटलच्या डॉक्टर दाम्पत्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यांच्याविरोधात गंभीर निष्काळजीपणाचा प्राथमिक आरोपही सिद्ध होत नसल्याचे निरीक्षण नोंदवून गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयाने गुन्हा रद्द केला. याबाबतचा आदेश न्या. आशिष चव्हाण यांनी दिला.
गोव्यात टॅक्सी सेवेसाठी अॅपव्यवस्था आवश्यक असल्याच्या भूमिकेवर राज्य सरकार ठाम असून राज्यात ‘गोवा माईल्स’ आणि ‘गोवा टॅक्सी’ ही दोनच अॅपसेवा यापुढेही सुरूच राहतील, असे स्पष्ट करून टॅक्सी भाडेदरांमध्ये समानता आणण्यासाठी स्थानिक टॅक्सीचालकांनाही डिजिटल प्रणालीत आणले जाईल, अशी माहिती वाहतूकमंत्री मॉविन गुदिन्हो यांनी दिली.
गोव्यात पर्यटनासाठी आलेल्या मध्यप्रदेशातील अनिकेत कुमार (२६) या युवकाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ही घटना सोमवार ९ रोजी उत्तररात्री १२.४० वाजण्याच्या सुमारास घडली.
एप्रिल महिन्यात होणारी ११ नगरपालिकांची निवडणूक विशेष सखोल मतदार पुनरीक्षण (एसआयआर) मोहिमेनंतर तयार झालेल्या मतदार यादीनुसार होणार आहे. याविषयीचा आदेश राज्य निवडणूक आयुक्त मिनीन डिसोझा यांनी जारी केला आहे.