नागरी पुरवठा खात्याची माहिती : भीतीमुळे नागरिकांकडून साठवणूक

पणजी : राज्यात गॅस सिलिंडरचा मुबलक साठा उपलब्ध असून, पुरवठा साखळी पूर्णपणे सुरळीत आहे. मात्र, टंचाईच्या भीतीने नागरिक मोठ्या प्रमाणात साठवणूक करत असल्यामुळे काही प्रमाणात समस्या निर्माण झाली आहे, अशी माहिती नागरी पुरवठा खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. सध्या गॅस डिलर्सना नियमित पुरवठा सुरू असून, व्यावसायिक सिलिंडरचे वितरणही पुन्हा सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे राज्यात गॅसचा तुटवडा नसल्याचे त्यांनी सांगितले.
नागरी पुरवठा खात्याने स्पष्ट केले की, एचपीसीएल (कुंडई), बीपीसीएल (वेर्णा) आणि आयओसीएल (बेळगाव) या तिन्ही एजन्सींकडे पुरेसा गॅस साठा उपलब्ध असून, गॅस डिलर्सकडे दररोज १ ते २ सिलिंडरच्या गाड्या येत आहेत. व्यावसायिक सिलिंडरचा पुरवठा पुन्हा सुरू करण्यात आला असून, सध्या निर्धारित कोट्यापैकी २० टक्के कोटा देण्यात येत आहे. हा कोटा टप्प्याटप्प्याने वाढवला जाणार आहे. घरगुती आणि व्यावसायिक दोन्ही प्रकारचे सिलिंडर उपलब्ध असून घरपोच सेवा देखील सुरू करण्यात आली आहे.
यंत्रणेतील बिघाडामुळे गोंधळ : मार्टीन्स
ग्राहक समन्वय विभागाचे अध्यक्ष रोलंड मार्टीन्स यांच्या मते, ही समस्या गॅस टंचाईमुळे नसून बुकिंग यंत्रणा कोलमडल्यामुळे निर्माण झाली आहे. गॅस कंपन्यांचे सर्व्हर डाऊन झाल्याने ग्राहकांची गैरसोय झाली. तसेच, सिलिंडरची घरपोच सेवा हा ग्राहकांचा हक्क असून, त्यासाठी ते शुल्कही भरतात, त्यामुळे ही सेवा पंचायतींनी देण्याऐवजी गॅस कंपन्यांनीच देणे बंधनकारक असल्याचे त्यांनी नमूद केले.
अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन
युद्धजन्य परिस्थितीमुळे गोव्यात गॅस टंचाई निर्माण होईल, या भीतीने वाळपईत नागरिकांनी सिलिंडर खरेदीसाठी मोठी गर्दी केली आहे. गेल्या दोन दिवसांपासून सिलिंडर एजन्सीबाहेर ग्राहकांच्या रांगा पाहायला मिळत आहेत. आंतरराष्ट्रीय तणावामुळे गॅस पुरवठा खंडित होईल, अशा अफवा पसरल्याने नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. गॅस एजन्सीच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांना दिलासा दिला असून, राज्यात सिलिंडरचा साठा समाधानकारक असल्याचे स्पष्ट केले आहे. नागरिकांनी घाबरून न जाता अफवांकडे दुर्लक्ष करावे आणि गरजेनुसारच सिलिंडरची खरेदी करावी, असे आवाहनही केले आहे.
पर्यटन क्षेत्रासह शॅक व्यवसायावर परिणाम
* सिलिंडरच्या तुटवड्याचा फटका पर्यटन व्यवसायासह शॅक व्यवसायालाही बसला आहे.
* अनेक रेस्टॉरंट्सनी आपला ‘मेनू’ मर्यादित केला असून, केवळ दुपारचे आणि रात्रीचे जेवण दिले जात आहे.
* अखिल गोवा पारंपरिक शॅक संघटनेचे अध्यक्ष मॅन्युएल कार्दोज यांनी सांगितले की, अद्याप व्यावसायिक सिलिंडरचा पुरवठा पूर्णपणे सुरळीत झालेला नाही.
* अनेक शॅक मालक कर्मचाऱ्यांचे जेवण चुलीवर बनवत असून, शिल्लक असलेले सिलिंडर केवळ पर्यटकांच्या ऑर्डरसाठी वापरले जात आहेत.
काळाबाजार रोखण्यासाठी कडक उपाययोजना
केंद्र सरकारने लागू केलेल्या जीवनावश्यक वस्तू कायद्याच्या (एस्मा) पार्श्वभूमीवर, गॅसचा गैरवापर किंवा काळाबाजार होऊ नये यासाठी कडक पावले उचलली आहेत. राज्यातील ५३ गॅस एजन्सींमध्ये नागरी पुरवठा खात्याने विशेष अधिकारी नियुक्त केले आहेत. हे अधिकारी सिलिंडरच्या वितरणावर बारीक लक्ष ठेवतील आणि साठवणूक होणार नाही याची खात्री करतील.
महिला काँग्रेसकडून चूल पेटवून सरकारचा निषेध
राज्यातील एलपीजी तुटवडा आणि दरवाढीविरोधात गोवा महिला काँग्रेसने शनिवारी पणजी मार्केटमध्ये रस्तावर चूल पेटवून सरकारचा निषेध केला. सिलिंडरचे दर ९२५ रुपयांवर गेल्याने गृहिणींचे बजेट कोलमडल्याचा आरोप प्रदेशाध्यक्षा प्रतीक्षा खलप यांनी केला. राज्यात ३ ते ५ हजार रुपयांना सिलिंडरची काळ्या बाजारात विक्री होत असल्याचाही आरोप करण्यात आला. मुख्यमंत्र्यांची गॅस साठ्याबाबतची विधाने खोटी असून, सामान्य जनता रांगेत उभी असल्याचा दावा आंदोलकांनी केला.