‘गॅस’अभावी व्यावसायिकांचा ‘घास’ अडकला!

व्यावसायिक सिलिंडरचा तुटवडा : हॉटेल्स बंद पडण्याची भीती

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
12th March, 11:30 pm
‘गॅस’अभावी व्यावसायिकांचा ‘घास’ अडकला!

पणजी : संपूर्ण गोव्यात निर्माण झालेल्या एलपीजी गॅस सिलिंडरच्या तीव्र टंचाईमुळे सर्वसामान्य नागरिक आणि व्यावसायिक हवालदिल झाले आहेत. या तुटवड्याचा सर्वाधिक फटका हॉटेल व रेस्टॉरंट व्यावसायिकांना बसला असून, ही स्थिती अशीच राहिल्यास पुढील दोन दिवसांत व्यवसाय तात्पुरता बंद करण्याची वेळ येऊ शकते. या गंभीर समस्येचे पडसाद गुरुवारी गोवा विधानसभेच्या अधिवेशनातही उमटले.

अधिवेशनाच्या सुरुवातीलाच विरोधी पक्षाने गॅस टंचाईच्या मुद्द्यावरून सरकारला धारेवर धरले. संपूर्ण गोव्यात गॅससाठी रांगा लागल्या असून लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे, असे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी नमूद केले. यावर स्पष्टीकरण देताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले की, राज्यामध्ये घरगुती गॅस सिलिंडरचा पुरेसा साठा उपलब्ध असून केवळ व्यावसायिक सिलिंडरच्या पुरवठ्यात समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे जनतेने घाबरून जाण्याची गरज नाही.

मात्र, व्यावसायिक वापरावर निर्बंध लागू झाल्याने हॉटेल व रेस्टॉरंटना याचा मोठा फटका बसू लागला आहे. पणजीतील मळा येथील बंगळुरू कॅफे गुरुवारी बंद ठेवावे लागले, तर इतर अनेक हॉटेलांनी खाद्यपदार्थांची संख्या कमी केली आहे. हॉटेल व रेस्टॉरंट संघटनेचे अध्यक्ष गौरीश धोंड यांनी इशारा दिला की, दोन दिवसांनंतर पणजीतील निम्मी हॉटेल्स बंद पडण्याची शक्यता आहे. या संदर्भात व्यावसायिकांनी मुख्यमंत्र्यांशी भेट घेऊन तोडगा काढण्याची विनंती केली आहे.

व्यावसायिकांसमोर सध्या अनेक आव्हाने उभी आहेत. दक्षिण गोवा हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष दीपक पै यांच्या मते, इंडक्शन शेगडीवर मोठी भांडी ठेवता येत नाहीत आणि विजेचे दरही जास्त असल्याने तो पर्याय व्यवहार्य नाही. हॉटेल्स बंद पडल्यास कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर गदा येईल आणि व्यावसायिकांना दिवसाला २० ते २५ हजार रुपयांचा फटका बसेल. या परिस्थितीचा थेट परिणाम पर्यटनावरही होत आहे.

केवळ हॉटेल्सच नव्हे, तर बेकरी उत्पादक आणि इतर पुरवठादारांचेही मोठे नुकसान होत आहे. व्यावसायिक सिलिंडरअभावी हॉटेल्स बंद झाल्यास भाजी, मासळी, मांस आणि पाव पुरवठा करणाऱ्यांचा व्यवसाय ठप्प होईल. अनेक बेकरी उत्पादकांना आता उत्पादन कमी करण्याची किंवा बेकरी बंद ठेवण्याची भीती सतावत असल्याचे ऑल गोवा बेकर्स असोसिएशनचे सचिव कोन्सेसिओ डिकॉस्टा यांनी सांगितले.

#GoaGasShortage #LPGShortage #GoaHotels #PanajiNews #GoaAssembly #PramodSawant #GoaTourism