राज्य निवडणूक आयोगाकडून आदेश जारी

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : एप्रिल महिन्यात होणारी ११ नगरपालिकांची निवडणूक विशेष सखोल मतदार पुनरीक्षण (एसआयआर) मोहिमेनंतर तयार झालेल्या मतदार यादीनुसार होणार आहे. याविषयीचा आदेश राज्य निवडणूक आयुक्त मिनीन डिसोझा यांनी जारी केला आहे.
वरील आदेशाची अधिसूचना जारी झाली आहे. एप्रिल महिन्यात पेडणे, वाळपई, डिचोली, म्हापसा, मुरगाव, मडगाव, कुंकळ्ळी, केपे, काणकोण, कुडचडे-काकोडा, सांगे या ११ नगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत. निवडणुकीसाठी प्रभाग फेररचनेची प्रक्रिया सुरू झाली आहे. प्रभाग फेररचनेसाठी अधिकाऱ्यांचीही नियुक्ती झाली आहे. प्रभाग फेररचनेनंतर प्रभाग आरक्षणाची अधिसूचना जारी केली जाणार आहे.
गोव्यासह अन्य राज्यांत केंद्रीय निवडणूक आयोगाने विशेष सखोल मतदार पुनरीक्षण (एसआयआर) घेण्याची मोहीम सुरू केली आहे. ही मोहीम पूर्ण झाल्यानंतर २१ फेब्रुवारी रोजी सुधारित मतदार यादी जाहीर झाली. पणजी महापालिका प्रभाग फेररचनेची प्रक्रिया सुधारित मतदार यादी जाहीर होण्याच्या आधीच सुरू झाल्याने राज्य निवडणूक आयोगाने पणजी महानगरपालिकेसाठी आधीच्या मतदार यादीनुसार निवडणूक घेतली. आता ११ नगरपालिकांच्या निवडणुकांसह फोंडा विधानसभा पोटनिवडणुकीसाठीही एसआयआर मोहिमेनंतर २१ फेब्रुवारी २०२६ रोजी जाहीर झालेल्या मतदार यादीनुसार निवडणूक घेतली जाईल. फोंडा आणि साखळी नगरपालिका वगळून राज्यातील अन्य नगरपालिकांचा कार्यकाळ एप्रिल वा मे महिन्यांत पूर्ण होतो. या सर्व नगरपालिकांसाठी एकत्रच निवडणूक घेतली जाणार आहे.