संयुक्त बैठकीत मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

फोंडा : गोवा डेअरीच्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना एप्रिल महिन्यापर्यंत दूध दरात वाढ करून देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत गुरुवारी पणजीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यासोबतच शेतकऱ्यांना दर महिन्याला वेळेवर आधारभूत किंमत देण्याचे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.
या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी गुरुवारी शेतकरी प्रतिनिधींना पणजीत बैठकीसाठी बोलावले होते. या बैठकीला गोवा डेअरीच्या शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ, सरकारने नियुक्त केलेली समिती, व्यवस्थापन मंडळ आणि पशुसंवर्धन खात्याचे अधिकारी उपस्थित होते. सर्वांशी सविस्तर चर्चा करून दरात वाढ करण्यावर एकमत झाले.
दूध दरात वाढ करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी काही दिवसांपूर्वी सरकार नियुक्त समितीला निवेदन सादर केले होते. मात्र, त्यावर कोणतीही अंमलबजावणी न झाल्याने बुधवारी शेतकऱ्यांनी डेअरीच्या प्रवेशद्वारासमोर धरणे आंदोलन सुरू केले होते. या आंदोलनाची तातडीने दखल घेत सरकारने दुसऱ्याच दिवशी, म्हणजेच गुरुवारी चर्चेसाठी बोलावणे धाडले.
दूध दरात वाढ करण्याच्या या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी नियुक्त केलेल्या समितीला पुढील आठ ते दहा दिवसांत सर्व प्रशासकीय सोपस्कार पूर्ण करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. त्यामुळे ही दरवाढ निश्चित झाली असून शेतकऱ्यांना नियमित आधारभूत किंमतही दिली जाईल, असे गोवा राज्य दूध उत्पादक उत्कर्ष संघटनेचे अध्यक्ष संजीव कुंकळ्ळेकर यांनी सांगितले.