उद्या निकाल : बाबूश, उत्पलची प्रतिष्ठा पणाला

भाटले येथील मतदान केंद्रावर मतदानासाठी रांगेत उभे असलेले मतदार.
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : महापालिकेच्या ३० प्रभागांसाठी बुधवारी मतदान शांततेत पार पडले. यंदा निवडणुकीत ६९.०७ टक्के मतदान झाले. २०२१ मध्ये ७०.१९ टक्के मतदान झाले होते. ही निवडणूक प्रामुख्याने भाजप समर्थित मंत्री बाबूश मॉन्सेरात यांचे ‘टुगेदर फॉर प्रोग्रेसिव्ह पणजी’ व उत्पल पर्रीकर यांचे ‘आमी पणजेकार’ पॅनलमध्ये झाली. मतदानानंतर दोन्ही पॅनलनी विजयाचा दावा केला आहे.
महापालिकेच्या ३० प्रभागांमध्ये ६९ उमेदवार रिंगणात होते. सकाळी ८ पासून मतदानाला चांगला प्रतिसाद मिळाला. दुपारनंतर मतदान काही काळ संथ गतीने सुरू होते. मात्र सायं. ४.३० नंतर मतदान केंद्रांवर पुन्हा गर्दी झाली. प्रभाग २३ मध्ये सर्वाधिक ८१.९४ टक्के, तर प्रभाग ३ मध्ये सर्वांत कमी ५३.०९ टक्के मतदान झाले.
मतमोजणी १३ मार्च रोजी सकाळी ८ पासून डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी स्टेडियम येथे सुरू होईल. लगेच निकाल जाहीर केला जाणार आहे. प्रभाग ४ मधील उमेदवार तथा महापौर रोहित मॉन्सेरात यांनी त्यांच्या पॅनेलने पाच वर्षांत केलेल्या विकासकामांच्या जोरावर निवडणूक लढवल्याचे सांगितले. पुढील पाच वर्षात आम्हाला आखणी विकासकामे करायची आहेत. मतदारांनी यावेळीही आम्हाला पाठिंबा दिला आहे, असेही ते म्हणाले.
मनोहर पर्रीकर यांच्याकडे चांगले नेतृत्व गुण होते. मात्र त्यांचे पुत्र उत्पल यांच्याकडे वडिलांसारखा एकही गुण नाही. पणजीत समस्या निर्माण झाल्या होत्या, त्यावेळी उत्पल गायब होते.
_ रोहित मॉन्सेरात, महापौर, पणजी
..
महापालिका निवडणुकीत मतदानाची टक्केवारी समाधानकारक आहे. ही लोकशाहीसाठी चांगली गोष्ट आहे. मतदारांनी कुणाला मत दिले हे १३ तारखेला समजेल.
_ बाबूश मॉन्सेरात, आमदार, पणजी
..
मागील पाच वर्षांत पणजीकरांच्या समस्या वाढल्या आहेत. आता त्यांना बदल हवा आहे. म्हणूनच लोक मतदान करत आहेत. प्रभाग फेररचना, आरक्षण करताना घोळ करण्यात आला आहे. यातूनच सत्ताधारी घाबरले असल्याचे दिसून येते.
- वाल्मिकी नाईक, प्रदेशाध्यक्ष, आप