पणजी महापालिका निवडणुकीचा शुक्रवारी निकाल

३० प्रभागांसाठी ६९ उमेदवार : रोहित विरुद्ध जॉन पोत थेट लढत

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
12th March, 10:51 pm
पणजी महापालिका निवडणुकीचा शुक्रवारी निकाल

पणजी महापालिकेचा निकाल शुक्रवारी; बाबुश मोन्सेरात की उत्पल पर्रीकर?

पणजी : पणजी महापालिका निवडणुकीचा निकाल शुक्रवारी, १३ मार्च रोजी लागणार आहे. सकाळी ८ वाजल्यापासून श्यामा प्रसाद मुखर्जी स्टेडियम येथे मतमोजणी सुरू होईल आणि त्यानंतर लगेचच अंतिम निकाल जाहीर केला जाईल. महापालिकेच्या एकूण ३० प्रभागांसाठी ६९ उमेदवारांमध्ये लढत झाली. यातील तेवीस प्रभागांत थेट दुहेरी, तर सहा प्रभागांत तिरंगी लढत झाली. प्रभाग क्रमांक २६ मध्ये सर्वाधिक ५ उमेदवार निवडणूक लढवत होते. यामुळे मंत्री बाबुश मोन्सेरात हे महापालिकेवरील आपले वर्चस्व कायम राखणार का, याबाबत सर्वत्र उत्सुकता निर्माण झाली आहे.

यावेळी महापालिका निवडणुकीत ६९.०७ टक्के मतदान झाले आहे. ही निवडणूक प्रामुख्याने भाजप समर्थित मंत्री बाबुश मोन्सेरात यांचे पॅनल व उत्पल पर्रीकर यांच्या ‘आमी पणजेकार’ पॅनलमध्ये झाली. मतदानानंतर दोन्ही पॅनलनी आपलाच विजय होणार असल्याचा दावा केला आहे. प्रचार कालावधीत ‘आमी पणजेकार’ पॅनलतर्फे कॅसिनो संबंधित समस्या, पार्किंग व शहरातील अन्य समस्यांवर भर देण्यात आला, तर बाबुश पॅनलतर्फे मागील पाच वर्षांत केलेल्या विविध विकासकामांवर भर देण्यात आला.

लक्षवेधी ठरलेल्या महत्त्वाच्या लढती

शहरातील काही प्रभागांमध्ये अत्यंत चुरशीच्या लढती पाहायला मिळत आहेत. प्रभाग क्रमांक ४ मध्ये महापौर रोहित मोन्सेरात यांच्या विरोधात ‘आमी पणजेकार’चे जॉन पो यांच्यात लढत झाली असून, येथे अग्नेलो सिल्वेरा हे तिसरे उमेदवार असल्याने चुरस आणखी वाढली आहे. याव्यतिरिक्त इतर प्रमुख प्रभागांमधील लक्षवेधी लढती खालीलप्रमाणे आहेत:

प्रभाग क्रमांक उमेदवारांमधील लढत
प्रभाग ६ बिनटो सिल्वेस्टर विरुद्ध डॉ. शीतल नाईक
प्रभाग ७ लियोनिड फुर्तादो विरुद्ध संजीव देसाई
प्रभाग ९ सुरेंद्र फुर्तादो विरुद्ध कबीर मखिजा
प्रभाग १० प्रसाद आमोणकर विरुद्ध विष्णू नाईक
प्रभाग १३ उदय मडकईकर विरुद्ध निळकंठ चारी
प्रभाग १७ एडवर्ड जॉर्ज विरुद्ध जॅक सुखिजा
#PanajiCCP #GoaElections #BabushMonserrate #UtpalParrikar #GoaPolitics #PanajiNews