दक्षिण गोव्यातील हॉटेल व्यवसाय संकटात; घरगुती सिलिंडरसाठीही रांगा

घरगुती सिलिंडरसाठी ग्राहकांनी लावलेली रांग. (संतोष मिरजकर)
..
प्रतिनिधी। गोवन वार्ता
मडगाव : दक्षिण गोव्यातील व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या तुटवड्यामुळे अनेक छोटे हॉटेल्स आणि खाद्यपदार्थांच्या दुकानांवर परिणाम झाला आहे. व्यावसायिक सिलिंडर देण्यावर निर्बंध आणण्यात आले आहेत. घरगुती सिलिंडर घेण्यासाठीही एजन्सीबाहेर लोकांच्या रांगा दिसत होत्या.
मडगाव, फातोर्डा, नावेलीसह परिसरातील हॉटेल मालकांच्या म्हणण्यानुसार, गेल्या काही दिवसांत व्यावसायिक गॅस सिलिंडरचा तुटवडा वाढला आहे. यामुळे रेस्टॉरंट्स, खानावळी आणि रस्त्यावरील खाद्यविक्रेत्यांना दैनंदिन खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी कसरत करावी लागत आहे. इराण व इस्रायलमधील युद्धामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे गॅस सिलिंडर वितरणावर परिणाम झाला आहे. व्यावसायिक सिलिंडरच्या बुकिंग व वितरणातील विलंबामुळे अनेक हॉटेल्सवर परिणाम होत असल्याचे दिसून आले.
खानावळ चालवणारे अँथनी फर्नांडिस म्हणाले, गॅस सिलिंडर तुटवड्याचा फटका कर्मचार्यांच्या रोजीरोटीवरही बसत आहे. एलपीजी नसल्यामुळे अन्न शिजवू शकत नाही. कधी कधी पदार्थ कमी करावे लागतात किंवा सेवा देणे लवकर बंद करावे लागते. खानावळीतील कर्मचार्यांचे उत्पन्न यावरच अवलंबून असल्याने ही चिंतेची बाब आहे.
आगाऊ ऑर्डर देऊनही वेळेवर गॅस सिलिंडरची डिलिव्हरी मिळत नाही. त्यामुळे एलपीजीवर पूर्णपणे अवलंबून असलेल्या व्यवसायांसमोर संकट उभे राहिले आहे. रेस्टॉरंटचालक रमेश नाईक म्हणाले, आमचे रेस्टॉरंट व्यावसायिक सिलिंडरवर अवलंबून आहे. याआधी बुकिंग केल्यावर दोन दिवसांत सिलिंडर मिळायचा, आता आठवडाभर वाट पाहावी लागत आहे. असेच सुरू राहिल्यास छोटी हॉटेल्स तात्पुरती बंद करावी लागतील. दक्षिण गोव्यातील रेस्टॉरंट मालकांनी प्रशासनाला आणि पुरवठादारांना या समस्येवर त्वरित तोडगा काढण्याची विनंती केली आहे.
फातोर्डा येथील ‘हॉटेल मराठा’चे मालक अनिल पाटील यांनी सांगितले की, याआधीच व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे जेवणाच्या किमतीत वाढ करण्याची वेळ आली आहे. आता गॅस सिलिंडर बुकिंग करूनही वेेळेवर उपलब्ध होत नाहीत. याआधी जादा पैसे देऊन कधीतरी सिलिंडर मिळायचे; पण या परिस्थितीत वाढीव पैसे देऊनही सिलिंडर मिळत नाही. ऑनलाईन बुकिंगसाठी प्रयत्न केला असता, तेही होत नाही व सिस्टिम योग्यरित्या चालत नसल्याची तक्रार त्यांनी केली.
मडगावमधील एलपीजी वितरकांनी पुरवठ्यातील अडचणी असल्याचे मान्य केले. व्यावसायिक सिलिंडरची मागणी अचानक वाढली असून सरकारने वितरणावर निर्बंध आणले आहेत. त्यामुळे पुरवठ्याला विलंब होत आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. तेल कंपन्यांशी समन्वय साधून येत्या काही दिवसांत पुरवठा सुरळीत होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. परिस्थिती सुधारेपर्यंत हॉटेल व्यावसायिक चिंतेत असून, लवकरात लवकर तोडगा न निघाल्यास मडगाव परिसरातील अनेक छोटे खाद्यपदार्थ विक्रीचे व्यवसाय बंद पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
बुकिंग केलेल्यांना सिलिंडर नक्की मिळणार : गॅस एजन्सी
ग्राहकांमध्ये अस्वस्थता पसरली असल्याने सिलिंडरसाठी रांगा लागत आहेत. सध्या चिंता करण्यासारखी स्थिती नाही. याआधी बुकिंगनंतर १५ दिवसांत गॅस सिलिंडर दिला जात होता. आता सरकारने २५ दिवसांचा कालावधी दिला आहे. व्यावसायिक सिलिंडर देण्यावर सरकारने निर्बंध आणले आहेत. घरगुती सिलिंडर आवश्यकतेनुसार उपलब्ध आहेत; पण अनेकांनी एकदम बुकिंग करण्याचा प्रयत्न केल्याने सिस्टिम डाऊन होत आहे. बुकिंगनंतर ४८ तासांत सिलिंडर दिले जात असले तरी सध्या त्यावर थोडा ताण आहे. बुकिंग केलेल्यांना सिलिंडर नक्कीच दिले जातील, असे अरोरा गॅस एजन्सीकडून सांगण्यात आले.
फोंडा परिसरात गॅस सिलिंडरबाबत लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे गॅस सिलिंडर पुरवठादारांच्या कार्यालयांत गर्दी दिसून आली. सिलिंडरचा तुटवडा नसला तरी ऑनलाईन बुकिंग होत नसल्याने लोकांनी कार्यलयात येऊन विचारपूस केली. बुधवारी दुपारनंतर फोंडा भागात गॅस सिलिंडरचे ऑनलाईन बुकिंग होत नसल्याने पुरवठादाराच्या कार्यलयात लोकांनी गर्दी केली. कार्यालयातील पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सिलिंडरचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. सिलिंडरचा तुटवडा झालेला नसून लोक मात्र युद्धाचा परिणाम होणार असल्याने भयभीत झाले आहेत. घरगुती गॅस सिलिंडरचा पुरवठा सुरळीत सुरू आहे.