गॅस सिलिंडर टंचाई वाढण्याची भीती

गॅस सिलिंडर तुटवड्याचा बार्देशातील हॉटेल, रेस्टॉरंटवर परिणाम


41 mins ago
गॅस सिलिंडर टंचाई वाढण्याची भीती

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी/म्हापसा : इराण-इस्रायल युद्धामुळे देशात सिलिंडरचा विषय गंभीर बनला असतानाच गोव्यातील सिलिंडर साठा केवळ १५ दिवस पुरेल इतकाच असल्याची माहिती खुद्द मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत दिल्यामुळे गोव्यावर सिलिंडर तुटवड्याचे संकट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, काही ठिकाणी बुकिंग करूनही सिलिंडचा पुरवठा होत नसल्याच्या तक्रारी ग्राहकांनी सुरू केल्या आहेत. सिलिंडर पुरवठा करणाऱ्यांना ग्राहकांनी अडवून बुकिंग केलेले सिलिंडर का दिले जात नाहीत, याबाबत जाबही विचारला. एकूणच चित्र पाहता गोव्यात घरगुती आणि व्यवसायिक सिलिंडरचे संकट गडद होण्याची चिन्हे आहेत.
व्यावसायिक सिलिंडरच्या तुटवड्यामुळे व्यावसायिकांसमोर मोठी समस्या निर्माण झाली आहे. बार्देश तालुक्यातील काही कॅफे आणि रेस्टॉरंट गुरुवारपासून बंद होण्याची शक्यता आहे. या समस्येसंदर्भात ग्राहक व प्रसारमाध्यमांना कोणतीही माहिती न देण्याचे निर्देश कंपनींकडून वितरकांना देण्यात आले आहेत. घरगुती गॅस सिलिंडरमध्ये तुटवडा नसल्याची माहिती मिळाली आहे.
बार्देशमध्ये सुमारे ६ हजार व्यावसायिक गॅस ग्राहक आहेत. सोमवारी या ग्राहकांना वितरकांकडून गॅस सिलिंडरचा तुटवडा असल्याचे सांगून घरपोच सुविधा खंडित केल्याची सूचना देण्यात आली होती. गॅस एजन्सीच्या गोदामावरही व्यावसायिक सिलिंडरचा पुरवठा केला जात नसल्याने हॉटेल्स, रेस्टॉरन्ट, चहा कॅफे, फास्टफूड यासारख्या व्यवसायांवर परिणाम झाला आहे. गॅस वितरक एजन्सीने सिलिंडरचा पुरवठा बंद केला असून आमच्याकडील सिलिंडरमधील गॅस संपत आला आहे. नाईलाजास्तव आम्हाला व्यवसाय बंद ठेवावा लागेल, असे हॉटेल व्यवसायिक मोहन सावंत यांनी सांगितले.
ग्राहक वितरकांच्या कारभारावर नाराज
गॅस सिलिंडरचा तुटवडा असल्याची अफवा पसरल्यामुळे बुधवारी सकाळपासूनच शहरातील गॅस वितरक एजन्सींबाहेर घरगुती सिलिंडर मिळवण्यासाठी ग्राहकांनी गंर्दी केली होती. यामुळे गॅस एजन्सीसमोर रांगा लागल्या. काही ग्राहकांनी वितरकांच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली.
अफवांना बळी पडू नका!
एका गॅस वितरकाने सांगितले की, सध्या व्यावसायिक आणि पाच किलोच्या गॅस सिलिंडरवर काही प्रमाणात निर्बंध आले आहेत. घरगुती सिलिंडरचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. गुरुवारपासून सिलिंडरची ‘होम डिलिव्हरी’ नियमितपणे सुरू राहील. अफवांना बळी पडून ग्राहकांनी गोदामाकडे धाव घेऊ नये. 


राज्यात १५ दिवस पुरेल इतका सिलिंडर साठा : मुख्यमंत्री
गोव्यात १५ दिवस पुरेल इतका एलपीजी सिलिंडरचा साठा शिल्लक आहे. याबाबत केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांशी चर्चा झाली आहे. त्यांनी राज्यात उपलब्ध असलेल्या सिलिंडरच्या साठ्याचा अहवाल मागवला आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.
विधानसभेत शून्य प्रहरावेळी आमदार केदार नाईक यांनी राज्यातील व्यावसायिक सिलिंडरच्या पुरवठ्यात होणाऱ्या टंचाईकडे लक्ष वेधले होते. विशेषतः मासेमारीसाठी खोल समुद्रात जाणाऱ्या ट्रॉलर आणि मोठ्या बोटींवरील कामगारांना १०-१० दिवस समुद्रात राहावे लागते. अशा वेळी त्यांना स्वयंपाकासाठी गॅसची मोठी गरज असते. लहान हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सनाही व्यावसायिक सिलिंडर मिळत नसल्याने त्यांचे व्यवसाय धोक्यात आले आहेत. गॅस एजन्सीकडे चौकशी केली असता, व्यावसायिक सिलिंडर देण्यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आल्याचे उत्तर मिळत असल्याचे नाईक यांनी सांगितले.
मुख्यमंत्री म्हणाले की, व्यावसायिक सिलिंडरचा पुरवठा बंद करण्याबाबत परिपत्रक प्रसिद्ध झाले आहे. या समस्येचे गांभीर्य ओळखून केंद्र सरकारने सचिव स्तरावर विशेष समिती स्थापन केली आहे. ही समिती कोणत्या राज्यात किती साठा उपलब्ध आहे आणि घरगुती व व्यावसायिक वापरासाठी किती पुरवठा केला जाऊ शकतो, याचा सविस्तर आढावा घेणार आहे. गोव्याचा वस्तुस्थितीदर्शक अहवाल केंद्र सरकारला सादर केला जाईल. केंद्र सरकारकडून अहवालांची छाननी झाल्यानंतर गॅस वितरक आणि एजन्सींना निर्देश दिले जातील. सध्या राज्याकडे १५ दिवस पुरेल इतका साठा उपलब्ध आहे. आगामी काळात गॅसचा पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे, असे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

एलपीजी गॅस सिलिंडर टंचाईचा हॉटेल्स व रेस्टॉरंटना फटका बसू लागला आहे. काहींनी एलपीजी गॅस सिलिंडरऐवजी इंडक्शन स्टोव्ह वापरण्यास सुरुवात केली आहे. या समस्येवर त्वरित उपाय काढण्याची गरज आहे.

_ मायकल लोबो, आमदार, भाजप

एलपीजी तुटवड्याचा पर्यटनाला फटका : पर्यटनमंत्री

राज्यात सध्या तरी एलपीजी सिलिंडरची कमतरता नाही. मात्र बाणावली, कोलवा भागातील काही शॅक बंद झाले आहेत. पुढे टंचाई भासेल म्हणून काही जणांनी आतापासूनच एलपीजी सिल‌िंडरचा वापर बंद केला आहे. एलपीजी सिलिंडरचा तुटवडा झाल्यास त्याचा हॉटेल, रेस्टॉरंट यांना फटका बसणार आहे. राज्याच्या पर्यटनालाही फटका बसण्याची शक्यता आहे, असे पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी सांगितले.