विरोधी आमदार आक्रमक : सभापतींसमोरील हौद्यात मारली बसकण

पणजी : गोवा विधानसभेच्या अधिवेशनाचा शुक्रवारचा दिवस मोठ्या गोंधळात सुरू झाला. गोवा शेतजमीन संरक्षण विधेयक खासगी विधिमंडळ ठराव म्हणून मांडण्यास परवानगी नाकारल्याचा आरोप करत विरोधी पक्षाच्या आमदारांनी सभागृहात जोरदार निषेध नोंदविला. या गदारोळामुळे सभापतींना कामकाज तीन वेळा तहकूब करावे लागले आणि सकाळचे संपूर्ण कामकाज ठप्प झाले.
शुक्रवारी सकाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच विरोधी पक्षाचे सर्व आमदार काळे कपडे परिधान करून आणि हातात फलक घेऊन सभागृहात दाखल झाले. अधिवेशन सुरू होताच विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी आज खासगी विधिमंडळ दिन असताना गोवा शेतजमीन संरक्षण विधेयक कामकाजात का घेतले नाही, असा सवाल उपस्थित केला.
या विधेयकाद्वारे टीसीपी कायद्यातील कलम ३९(अ) आणि १७(२) रद्द करण्याची मागणी असल्याचे सांगत या संदर्भात स्पष्ट भूमिका मांडण्याची मागणी विरोधकांनी केली. त्यानंतर विरोधी आमदारांनी हातात फलक घेऊन घोषणाबाजी सुरू केली.
परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सभापतींनी वारंवार आवाहन केले. मात्र विरोधक ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते. त्यांनी सभापतींसमोरील हौद्यात बसकण मारली. यानंतर सभापतींनी सर्व विरोधी आमदारांना सभागृहाबाहेर काढण्याचे आदेश दिले. मार्शल्सनी त्यांना बाहेर काढण्यास सुरुवात केली; मात्र विरोधकांनी जागा सोडण्यास नकार दिला. त्यामुळे सभापतींना कामकाज १० मिनिटांसाठी तहकूब करावे लागले.
कामकाज पुन्हा सुरू झाल्यानंतरही विरोधकांनी गोंधळ सुरूच ठेवला. सभापतींनी प्रथम सरकारचे स्पष्टीकरण ऐकून घ्यावे, त्यानंतर चर्चा करावी, अशी विनंती केली; मात्र विरोधकांनी घोषणाबाजी सुरूच ठेवली. त्यामुळे सभापतींनी कामकाज अर्ध्या तासासाठी पुन्हा तहकूब केले.
यानंतर तिसऱ्यांदा कामकाज सुरू झाल्यावर सभापतींनी स्पष्ट केले की, संबंधित खासगी विधिमंडळ ठराव तपासणीसाठी संबंधित खात्याकडे पाठविण्यात आले असून त्या प्रक्रियेवर काम सुरू आहे. विभागाकडून उत्तर येणे बाकी असल्याचेही त्यांनी सांगितले. तथापि, विरोधकांनी हे स्पष्टीकरण मान्य करण्यास नकार दिला. गेली चार वर्षे अशाच पद्धतीने त्यांच्या विधेयकांवर अडथळे आणले जात असल्याचा आरोप करत त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
सकाळचे संपूर्ण कामकाज ठप्प
शून्यकालात कुडचडेचे आमदार नीलेश काब्राल प्रस्ताव मांडत असताना विरोधी आमदार त्यांच्या आसनापर्यंत जाऊन निषेध नोंदवू लागले. त्यामुळे सभागृहात पुन्हा गोंधळ उडाला. या सततच्या गदारोळामुळे सभापतींना कामकाज तिसऱ्यांदा स्थगित करावे लागले. परिणामी, प्रश्नोत्तर तास आणि शून्यकालात कोणताही ठोस निर्णय न घेता सकाळचे संपूर्ण कामकाज ठ्प्प झाले.